गिताबोध – आपण केवळ कर्मच नाही.
>> गुरुनाथ तेंडुलकर
भगवद्गीता या ग्रंथाबद्दल अनेक लोकांच्या मनात एक मोठा गैरसमज आहे. ते म्हणतात की, ‘भगवद्गीता हा ग्रंथ फार मोठा आणि जाडजूड आहे. त्यामुळे तो आम्ही वाचत नाही. त्याशिवाय तो संस्कृतमधे असल्यामुळे तो आम्हाला कळत नाही.’
हा गैरसमज बाळगणाऱयांसाठी पुन्हा एकदा मुद्दाम सांगतो की, भगवद्गीता हा ग्रंथ फार मोठा आणि जाडजूड वगैरे अजिबात नाही. यात केवळ सातशेच श्लोक आहेत. या सातशे श्लोकांवर मात्र अनेकांनी अनेक भाष्ये लिहिली आहेत. त्यात प्रामुख्याने संतशिरोमणी ज्ञानेश्वर माऊलींच्या ज्ञानेश्वरीपासून ते अगदी अलीकडच्या काळातील ‘गीतासागर’ हे महाभाष्य लिहिणाऱया गुरुदेव शंकर वासुदेव अभ्यंकरांपर्यंत अनेकांची नावे सांगता येतील. लोकमान्य टिळकांच्या ‘गीतारहस्य’पासून ते ओशोंच्या ‘गीतादर्शन’पर्यंत अनेक ग्रंथांतून भगवद्गीता उलगडून सांगितली आहे. ज्यांना संस्कृत समजत नाही अशा सर्वसामान्य जनांसाठी अनेक संतमहंतांनी आणि बुद्धिमंतांनी भगवद्गीता समजावण्यासाठी हातभार लावला आहे. त्यामुळे ‘भगवद्गीता हा जाडजूड ग्रंथ आहे. तो संस्कृतमधे आहे,’ अशा सबबी न सांगता भगवद्गीतेचा अभ्यास सुरू करावा म्हणजे आयुष्य उजळून निघेल. या सातशे श्लोकांपैकी जर केवळ एकच श्लोक निवडून त्यावर अभ्यास करायचा असेल तर तो श्लोक म्हणजे दुसऱया अध्यायातील सत्तेचाळिसावा श्लोक.
आपल्याकडे केवळ कारवाई करण्याचा अधिकार आहे, फळांवर कधीही नाही.
कृतीच्या फळांचे कारण होऊ नका किंवा आपले संलग्नक निष्क्रियतेसाठी होऊ द्या.
ते कृतीतच आहेत. फळांमध्ये कधीही नाही, नाही.
कृतीच्या फळांचे कारण देऊ नका. निष्क्रियतेशी संबंधित होऊ नका.
भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की, ‘केवळ कर्म करण्यापुरताच तुला अधिकार आहे. त्या कर्माचे फळ मिळणे किंवा न मिळणे हे तुझ्या अधिकाराच्या कक्षेत येत नाही. म्हणूनच तू आपल्या कर्माचे अमुकच एक फळ मिळावे असा हेतू मनात न ठेवता केवळ कर्म करीत राहा आणि त्याचबरोबर कर्म टाळण्याचा किंवा कर्म न करण्याचा (अकर्मणि) विचारही करू नकोस.
आपण सर्वसामान्य माणसे ज्यावेळी एखादे काम मनात योजतो त्यावेळी त्या कामापासून आपल्याला काय लाभ होणार याचाच विचार करूनच ते काम करतो. किंबहुना त्या कामापासून आपल्याला काही लाभ होणार नसेल तर ते काम कशाला करायला हवे असा विचार करून काम टाळण्याकडे सर्वसामान्यांचा कल असतो. अशा सगळ्या सामान्य लोकांसाठी भगवान श्रीकृष्ण अर्जुनाच्या निमित्ताने हा फार महत्त्वाचा बोध सांगताहेत. पृथ्वीवरच्या सगळ्या जीवसृष्टीचा विचार केला तर केवळ मनुष्य हा एकमेव सजीव प्राणी असा आहे की, जो काहीतरी नवीन कर्म करू शकतो. म्हणूनच भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की, तू तुझे नेमून दिलेले कर्म चोखपणे पार पाड. ते कर्म करताना त्यातून कोणत्या प्रकारचे फळ मिळेल याचा विचार करू नकोस. केवळ कर्म करणे एवढेच तुझ्या हातात आहे. ते तू नीट कर.
सव्वाशे वर्षापूर्वी स्कॉटलंडमधे घडलेली एक सत्यघटना सांगतो. एका शेतकऱ्याला त्याच्या शेताजवळच्या घरात काम करताना ‘मेलो… मेलो… वाचवा वाचवा…’ अशा किंकाळ्या ऐकू आल्या. तो शेतकरी आपले काम थांबवून आवाजाच्या दिशेने धावला. त्याने पाहिले की तळ्याजवळच्या दलदलीमधे एक पोरसवदा मुलगा कंबरेपर्यंत चिखलात फसला आहे. घाबरलेल्या त्या मुलाला शेतकऱयाने धीर देत मोठी काठी, दोरी वगैरे साहित्य घेऊन त्या मुलाला शिताफीने दलदलीतून बाहेर काढले.
दुसरे दिवशी त्या शेतकऱयाच्या घरासमोर एक मोठी मोटारगाडी उभी राहिली आणि त्यातून एक श्रीमंत गृहस्थ पैशांची थैली घेऊन खाली उतरले. ते त्या जीव वाचलेल्या मुलाचे वडील होते. त्यांनी शेतकऱ्याचे आभार मानून त्याला ती थैली देऊ केली, पण शेतकऱयाने ती नम्रपणे नाकारली. ‘मी जे केलं ते पैसे मिळावे म्हणून केलेलं नाही. मी माझं कर्तव्य केलं. त्याच्याजागी माझा मुलगा असता तर… तर मी जे करायला हवं होतं तेच केलं.’ त्या श्रीमंत गृहस्थांनी चौकशी केल्यानंतर त्यांना समजले की, त्या शेतकऱयालादेखील आपल्या मुलाच्या वयाचा एक मुलगा आहे. हे समजताच ते गृहस्थ त्या शेतकऱयाला म्हणाले. ‘ठीक आहे. तू पैसे घेऊ नकोस. पण तुझ्या मुलाला मी शहरात घेऊन जातो. याला माझ्या मुलाच्या बरोबरीने शिक्षण देऊन मोठा करतो.’ शेतकऱयाच्या मुलाला ते गृहस्थ घेऊन गेले आणि पुढे तो मुलगा डॉक्टर बनला. केवळ साधासुधा डॉक्टर नाही तर त्याने वैद्यकीय क्षेत्रात महत्त्वाचे संशोधन केले. त्या मुलाचे नाव जगाच्या इतिहासात अजरामर झाले. त्याचे नाव होते सर अलेक्झांडर फ्लेमिंग. ज्यांनी 1928 साली आद्य जंतुनाशक (ज्याला इंग्रजीत अँटिबायोटिक म्हणतात.) त्या पेनिसिलीनचा शोध लावला. आता खरी गंमत सांगतो. त्या शेतकऱयाने ज्या मुलाला वाचवले होते तो मुलगा पुढे ब्रिटनचा पंतप्रधान झाला. त्यांचे नाव आजही आदराने घेतले जाते. ते नाव म्हणजे सर विन्स्टन चर्चिल! पुढे हेच चर्चिल साहेब न्युमोनियाने आजारी पडले. त्यांच्यावर इतर कोणत्याही औषधांचा परिणाम होत नव्हता. अशा वेळी पेनिसिलीनच्या मदतीने त्यांचा जीव वाचला. त्या पेनिसिलीनचा शोध त्या शेतकऱयाच्या मुलाने लावला होता.
आता सांगा, शेतकऱयाने मानवधर्माला अनुसरून जे कर्तव्य केले त्यावेळी त्याने कोणत्याही फळाची इच्छा मनात धरलीच नव्हती. मला काय मिळणार असा विचार करून जर त्या शेतकऱ्याने दलदलीत अडकलेल्या मुलाला वाचवले असते तर… शेतकऱयाने सद्भावनेने केलेल्या कर्माचे फळ आपोआप मिळाले. ते नियतीने दिले. दैवाने दिले. परमात्म्याने दिले. भगवान श्रीकृष्णही हेच सांगताहेत की, मला काय मिळेल याचा विचार न करता केवळ कर्म करीत रहा. फळ आपोआप मिळेल.
अर्थात ही गोष्ट महाकठीण असल्याचे भान आहेच. तुम्ही आम्ही सर्वसामान्य लोक जर फळ मिळणार नसेल तर कर्म कशासाठी करायचे? असा विचार करून काम टाळतो. काम करण्यापूर्वी ‘मला यातून काय मिळेल?’ हाच विचार करतो. परंतु भविष्यात काय मिळेल याचा विचार केल्यामुळे नेमके काय होत्sढ? काम करतानाच त्या कामातून मिळणाऱया फळाबद्दल मनामधे आशा, अपेक्षा निर्माण होतात. त्या आशा-अपेक्षांची पूर्तता होईल की नाही या विचारांनी माणसाच्या मनात शंका कुशंका निर्माण होतात. त्यातून अनेकदा माणसे नैराश्य, भीती आणि चिंतेने ग्रासली जातात. पुढे काय घडेल या भविष्याचा विचार करताना आताचा जिवंत क्षण हातातून निसटून जातो. मागे काय घडले? या भूतकाळाचा विचार आणि भविष्यकाळाची चिंता यामध्ये वर्तमानकाळ हरवून जातो. ज्या गोष्टी आपल्या हातात नाहीत त्याचा विचार केल्याने साध्य तर काहीच होत नाही. उलट ज्या गोष्टी आपल्या हातात आहेत त्यादेखील धडपणे करता येत नाहीत.
या श्लोकावर भाष्य करताना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात…
परि कर्मफळी आस न करावी । आणि कुकर्मी संगति न व्हावी ।
हे सक्रियाचि आचरावी । हेतूविण ।।
आपल्यासारख्या सर्वसामान्यांनी प्रयत्न केला तर आपल्याला अशा प्रकारच्या फलाची आसक्ती न धरता केवळ कर्तव्यभावनेने काम करण्याची कला थोडय़ाफार प्रमाणात तरी जमू शकेल असे मला वाटते.
Comments are closed.