भाजप प्रश्न राहुल गांधींच्या परदेशी भेटी

सततच्या व्हिएतनाम भेटीबाबत संशय व्यक्त : काँग्रेसकडूनही प्रत्युत्तर

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या विदेश दौऱ्यांवर भाजपने पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित केले आहेत. शनिवारी भाजप नेते रविशंकर प्रसाद यांनी याबाबतचा मुद्दा उपस्थित करत राहुल गांधी आपल्या संसदीय मतदारसंघापेक्षा व्हिएतनाममध्ये जास्त वेळ घालवत असल्याचे म्हटले आहे. ‘राहुल गांधी सतत व्हिएतनाम आणि इतर देशांना भेटी देत आहेत. त्यांना अचानक व्हिएतनामबद्दल इतके प्रेम का वाटले? राहुल गांधी हे विरोधी पक्षनेते असल्यामुळे ते भारतात उपलब्ध असले पाहिजेत. त्यांच्या या विदेशी वाऱ्यांमुळे शिष्टाचार आणि राष्ट्रीय सुरक्षेबद्दल गंभीर प्रश्न उपस्थित होतात, असे भाजपने म्हटले आहे.

राहुल गांधी यांनी आग्नेय आशियाई देशाबद्दल त्यांचे ‘असाधारण प्रेम’ स्पष्ट करावे, असे भाजप नेते रविशंकर प्रसाद यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. चालू वर्षातही त्यांनी सुमारे 22 दिवस आग्नेय आशियाई देशात घालवले होते. त्यामुळे राहुल गांधींनी व्हिएतनामबद्दलच्या आपल्या विलक्षण प्रेमाचे स्पष्टीकरण द्यावे. त्यांचे वारंवार होणारे विदेश दौरे खूपच आश्चर्यकारक आहेत, असे ते पुढे म्हणाले.

भाजपच्या या प्रश्नांना काँग्रेसने प्रत्युत्तर दिले आहे. भाजप गेल्या काही काळापासून राहुल गांधींच्या परदेश दौऱ्यांना लक्ष्य करत आहे. यावर काँग्रेसने भाजपवर राहुल गांधींच्या वैयक्तिक भेटीचे राजकारण करण्याचा आरोप केला आहे. एक व्यक्ती म्हणून त्यांना परदेशात प्रवास करण्याचा अधिकार असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.

गेल्यावर्षी 26 डिसेंबर रोजी माजी पंतप्रधान आणि काँग्रेस नेते मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर गांधींच्या व्हिएतनाम दौऱ्यावर भाजपने टीका केली होती. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनाने देश शोक व्यक्त करत असताना राहुल गांधी नवीन वर्ष साजरे करण्यासाठी व्हिएतनामला गेले होते, असा आरोप भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी केला होता.

Comments are closed.