माणिकराव कोकाटेंच्या अडचणी वाढणार, सत्र न्यायालयाच्या आदेशाला हायकोर्टात आव्हान

शासकीय कोट्यातील सदनिका घेताना कागदपत्रांमध्ये फेरफार केल्याप्रकरणी गोत्यात आलेले कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अडचणी आणखी वाढणार आहेत. कोकाटे यांच्या शिक्षेला नाशिक सत्र न्यायालयाने दिलेल्या स्थगितीला माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांच्या कन्या अंजली राठोड यांनी हायकोर्टात आव्हान दिले असून स्थगिती रद्द करण्याची मागणी केली आहे. 18 मार्चला न्यायमूर्ती आर. एन. लढ्ढा यांच्या एकलपीठासमोर याचिकेची सुनावणी होणार आहे.

कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना कनिष्ठ न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा तसेच पन्नास हजार रुपयांचा दंड ठोठावला होता. या शिक्षेला नाशिकच्या सत्र न्यायालयाने स्थगिती दिली. याविरोधात माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांच्या कन्या अंजली दिघोळे राठोड यांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. नाशिक सत्र न्यायालयाने हा निर्णय घाईघाईत दिला. न्यायालयाने प्रतिवादींना बाजू मांडू दिली नाही, असा दावा करत अंजली आशुतोष राठोड यांनी हायकोर्टात अ‍ॅड. देवव्रत सिंह यांच्यामार्फत याचिका दाखल केली आहे.

शिक्षेला स्थगिती देण्याचा निर्णय अयोग्य, प्रतिवादींना बाजू मांडू दिली नसल्याचा अ‍ॅड. सतीश वाणी यांचा दावा

कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती देण्याचा न्यायालयाचा निर्णय मान्य नाही, असे अ‍ॅड. सतीश वाणी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. न्यायालयाने हा निर्णय घाईगर्दीत दिला, प्रतीवादींना बाजू मांडू दिली नाही, हा अयोग्य निकाल आम्हाला मान्य नसल्याने त्याविरोधात आम्ही उच्च न्यायालयात दाद मागितली आहे, असे अ‍ॅड. सतीश वाणी यांनी स्पष्ट केले. शिक्षेची कारवाई व्हावी यासाठी राज्यपालांकडे पत्रव्यवहार करणार असल्याचेही ते म्हणाले. स्थगिती देणाऱ्या न्यायाधीशांवर कोणाचा दबाव होता का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

18 मार्चला शिंदेंचे उपोषण

मंत्री कोकाटे व त्यांचे बंधू विजय यांना दिलेल्या शिक्षेची अंमलबजावणी व्हावी, सहा महिन्याच्या आत पोटनिवडणूक घ्यावी, या मागणीसाठी सिन्नर संघर्ष समितीच्या वतीने 18 मार्चला नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्यात येईल, अशी घोषणा शरद शिंदे यांनी केली आहे.

Comments are closed.