आधार-मतदार कार्ड संबंधित बैठक
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
आधार कार्डाला मतदार ओळख पत्राशी जोडण्याच्या विषयावर केंद्रीय निवडणूक आयोगाने पुढच्या आठवड्यात एका महत्वाच्या बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीत केंद्रीय गृहविभाग, विशेष परिचयपत्र प्राधिकरण तसेच केंद्रीय कायदा विभागाचे अधिकारी समाविष्ट होणार आहेत. मतदाराचे आधार कार्ड आणि मतदार परिचयपत्र यांना जोडण्याविषयीच्या संबंधात या बैठकीत विचार केला जाणार आहे. 2021 मध्ये जनप्रतिधित्व कायद्यात परिवर्तन करण्यात आले होते. या परिवर्तनानुसार मतदाराचे आधार कार्ड आणि त्याचे मतदार परिचयपत्र यांना जोडण्याची अनुमती आयोगाला देण्यात आली होती. त्यानंतर आयोगाने मतदारांकडून ऐच्छिक आधारावर त्यांचे आधार कार्ड क्रमांक घेण्यास प्रारंभ केला होता. तथापि, आतापर्यंत ही दोन्ही परिचयपत्रे एकमेकांशी जोडली गेलेली नाहीत. मतदार सूचींमध्ये बनावट नावे असल्यास ती हटविण्याचे अभियान सध्या केंद्रीय निवडणूक आयोगाने हाती घेतले आहे. काही राज्यांमधील स्थानिक निवडणूक आयोगांनी मतदार परिचयपत्र देताना चुकीच्या अल्फान्यूमरीक मालिकेचा उपयोग केला आहे. त्यामुळे काही मतदारांजवळ एकापेक्षा अधिक मतदार परिचयपत्रे आहेत. ती येत्या तीन महिन्यांमध्ये रद्द करण्याची आयोगाची योजना आहे. एकाहून अधिक परिचयपत्रे असली तरी मत एकच टाकता येते, हे आयोगाने यापूर्वीच स्पष्ट केले आहे. त्यामुळे केव्हाही एका मतदाराला एकापेक्षा अधिक मते टाकण्याची संधी मिळालेली नाही. तरीही मतदार सूची शुद्ध करण्यासाठी दुहेरी मतदार परिचयपत्रे रद्द केली जाणार आहेत. म्हणून आधार-मतदारा परिचयपत्र जुळणीसंबंधी बैठक आयोजित करण्यात आल्याचे स्पष्टीकरण आयोगाने दिले आहे.
Comments are closed.