सुपर ओव्हर … सुपर फ्लॉप

क्रीडा क्षेत्रातही अनेक अनपेक्षित घटना घडतात, याचा अनुभव आपल्याला आहे. अशी एक अद्भूत घटना क्रीकेटच्या विश्वात घडली आहे. शुक्रवारी बहारीन आणि हाँगकाँग या दोन संघांमध्ये झालेल्या एका सामन्यात अशी घटना घडली आहे की तिच्यावर सहजासहजी विश्वास बसणे कठीणच आहे. मर्यादित षटकांच्या क्रीकेट सामन्यांमध्ये दोन्ही संघांची धावसंख्या समान झाली, तर सुपर ओव्हर खेळली जाते. सुपर ओव्हरचा प्रारंभ 16 वर्षांपूर्वी झाला. पण गेल्या 16 वर्षांमध्ये जो प्रकार कधी घडला नव्हता, किंवा घडेल असे कल्पनेतही कोणाला वाटले नव्हते, तो प्रकार या सामन्यात घडला आहे. हा सामना मलेशिया मालिकेतील आहे.

या 20 षटकांच्या सामन्यात हाँगकाँग संघाने प्रथम फलंदाजी करताना 129 धावा जमविल्या. त्यानंतर बहारीन संघानेही 20 षटकांमध्ये नेमक्या तेव्हढ्याच, अर्थात 129 धावा केल्या. त्यामुळे सामन्याचा निर्णय सुपर ओव्हरमध्ये लागणार होता. आंतरराष्ट्रीय क्रीकेट मंडळाच्या नियमानुसार सुपर ओव्हरमध्ये दोन विकेटस् पडल्या की तो संपूर्ण संघ बाद धरला जातो. या सामन्यातील सुपरओव्हरमध्ये असेच घडले. सुपर ओव्हरच्या पहिल्या दोन चेंडूंवर दोन बळी गेल्याने बहारीनचा संघ एकही धाव न काढता बाद झाला. सुपर ओव्हर मध्ये एकही धाव न काढणारा बहारीनचा संघ जगातील एकमेव ठरला आहे. त्यानंतर हाँगकाँगचे काम सोपे होते. त्या संघाने त्याच्या सुपर ओव्हरमध्ये तिसऱ्या चेंडूवर एक धाव काढून हा सामना जिंकला. पण बहारीनचा संघ एका अनोख्या आणि नकारात्मक विक्रमाचा धनी ठरला. सुपर ओव्हरच्या इतिहासात प्रथमच असे घडल्याने हा सामना चर्चेचा विषय झाला असून बहारीनच्या संघाच्या नावावर हा ‘विक्रम’ लागला आहे.  सुपर ओव्हर पर्यंत पोहचलेला हा इतिहासातील 33 वा सामना आहे. बहारीनचा संघ सुपरओव्हरमध्ये हारण्याचीही ही प्रथमच वेळ आहे, अशी माहिती आहे.

Comments are closed.