‘सावित्रीं’च्या आंदोलनाचा दणका, 225 आशा सेविकांची होळी गोड; पाच महिन्यांचे लटकलेले पगार खात्यात

आशा सेविकांच्या सावित्री आंदोलनाच्या दणक्यानंतर उल्हासनगर पालिका ताळ्यावर आली आहे. पालिका आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी या आंदोलनाची दखल घेत पाच महिन्यांचा लटकलेला पगार आशा सेविकांच्या खात्यात जमा केला आहे. त्यामुळे आशा सेविकांची होळी गोड झाली असून प्रशासनाने यापुढेदेखील मानधन वेळेत द्यावे अशी मागणी केली आहे.

महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात गेल्या अनेक वर्षांपासून या आशा स्वयंसेविका काम करत आहेत. कोविडचा काळ, पूरपरिस्थिती तसेच आपत्ती काळात नेहमीच आशा सेविका जीव मुठीत धरून दिलेली जबाबदारी इमानेइतबारे पार पाडत असून त्यांना दरमहा 10 हजार रुपये मानधन देण्यात येत आहे. मात्र या आशा सेविकांना ऑक्टोबर 2024 पासून मानधनाची फुटकी कवडी देण्यात आली नव्हती. पालिकेच्या या भोंगळ कारभाराविरोधात सावित्रीबाई फुले पुण्यतिथी दिवशी आशा स्वयंसेविका संघातर्फे भगवान दवणे, डॉ. राजाराम रासकर यांच्या नेतृत्वाखाली महानगरपालिकेवर मोर्चा काढण्यात आला होता. याबाबत दैनिक ‘सामना’ने 11 मार्च रोजी सचित्र वृत्त प्रसिद्ध करत प्रशासनावर टीकेची झोड उठवली. यानंतर प्रशासनाची पळापळ झाली आणि आशा सेविकांना त्यांचे पाच महिन्यांचे मानधन त्यांच्या खात्यात जमा करण्यात आले.

कोरोना काळात आशा सेविकांनी केलेले काम वाखाणण्याजोगे होते. याबाबत प्रशासनाने त्यांचे अनेकदा कौतुकही केले आहे. मात्र मानधन देताना या गोष्टीचा विसर पडत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे. आंदोलन केल्यावर पालिकेला जाग येईल का, असा सवालही आशा सेविकांनी केला आहे.

अनोख्या आंदोलनाने लक्ष वेधले

पाच महिन्यांचे मानधन मिळत नसल्याने आशा सेविका मेटाकुटीला आल्या होत्या. अखेर प्रशासनाला धडा शिकवण्यासाठी सर्व आशा सेविकांनी सावित्रीबाई फुले यांचे मुखवटे घालून पालिकेवर धडक दिली. या अनोख्या आंदोलनाने सर्वांचे लक्ष वेधले. आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी तत्काळ 225 आशा सेविकांच्या खात्यात पाच महिन्यांचा एकत्रित धनादेश जमा करण्याचे आदेश संबंधित अधिकारी दिनेश सरोदे यांना दिले होते. एकत्रित मानधन मिळाल्याने आशा सेविकांना दिलासा मिळाला आहे.

Comments are closed.