कारमध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, बसस्टॉपवर सोडतो सांगून नराधमाने घात केला

स्वारगेट बस स्थानकात एका 26 वर्षीय तरुणीवर अत्याचाराची घटना घडून पंधरवडा उलटलेला असतानाच या घटनेची पुनरावृत्ती आता पनवेलमध्ये घडली आहे. कॉलेजला निघालेल्या एका 16 वर्षीय मुलीला बसस्टॉपवर सोडतो असे सांगून ओळखीच्या नराधमाने आपल्या कारमध्ये बसवले. कार बसस्टॉपवर नेण्याऐवजी निर्जनस्थळी नेली आणि तिच्यावर कारमध्येच अत्याचार केला. याप्रकरणी पनवेल ग्रामीण पोलिसांनी नराधमाला अटक केली आहे.
पनवेल परिसरातील भानघर येथे राहणारी 16 वर्षीय अल्पवयीन मुलगी शहरातील एका महाविद्यालयात इयत्ता ११ मध्ये शिक्षण घेत आहे. ती नेहमीप्रमाणे सकाळी 6 वाजता कॉलेजला निघाली होती. त्यावेळी या मुलीच्या ओळखीचा अमोल पदरथ (42) हा तिथे आपली इको गाडी (एमएच) घेऊन आला. तुला शांतीवन बसस्टॉपला सोडतो असे सांगून त्याने तिला आपल्या गाडीत बसवले. मात्र गाडी शांतीवन बसस्टॉपकडे नेण्याऐवजी चिंचवली परिसरात निर्जनस्थळी नेली. त्या ठिकाणी त्याने कारमध्येच या मुलीला आपल्या वासनेची शिकार बनवले. या प्रकाराची वाच्यता केली तर जिवे मारण्याची धमकी दिली. हा प्रकार 3 मार्च रोजी घडला. तेव्हापासून ही मुलगी प्रचंड तणावाखाली होती. घडलेला प्रकार तिने पालकांना सांगितल्यानंतर त्यांनी पनवेल ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून अमोल पदरथला अटक केली. याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्चना कुदळे पुढील तपास करीत आहेत.
Comments are closed.