चारशे वर्षापूर्वीची कबर खणायला निघालेयत पण यांना तीन हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या दिसत नाहीत; संजय राऊत यांचा घणाघात

मुघल शासक औरंगझेबाच्या कबरीवरून सध्या राजकारण तापलं आहे. राष्ट्रीय स्वयंसेवकर संघ प्रणित बजरंग दल व विश्व हिंदू परिषदेने पत्रकार परिषद घेत कबर नेस्तनाबूत करण्याचा इशारा दिला आहे. तसेच सध्या झटका मटणवरून देखील वाद निर्माण झाला आहे. त्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी त्यांना फटाकरले आहे. ”या विकसीत कृषीप्रधान महाराष्ट्रात तीन हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत त्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने कधी आपली भूमिका मांडली आहे का? चारशे वर्षापूर्वीची कबर खणायला निघालेयत पण यांना तीन हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या दिसत नाहीत का? असा घणाघात संजय राऊत यांनी केला आहे.
हिंदूंसाठी मटणाचे वेगळे दुकान आणि मुसलमानांसाठी वेगळे दुकान हा काय तमाशा लावलाय. महाराष्ट्रात दोन वर्षात तीन हजारापेक्षा जास्त शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. तीन हजारापेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आणि तुम्ही हलाल आणि झटक्यावर बोलत आहेत. कोणता देश चालवतायत तुम्ही. हिंदू मुसलमान केल्याने या सर्व समस्या संपणार आहेत का? जेव्हा काहीही राजनितीक संकट येतं तेव्हा हिंदू मुसलमान मुद्दे मांडले जातात. हा देश विभाजनाकडे चालला आहे. 1947 च्या आधीची परिस्थिती व आताची परिस्थिती सारखीच वाटतेय. तेव्हाही काही लोकांनी अशीच परिस्थिती निर्माण केली होती. धर्माच्या आधारावर फाळणी होत होती. तेव्हा जवाहरलाल नेहरू म्हणाले होते की मी भारताचा हिंदू पाकिस्तान होऊ देणार नाहीत. हा देश मी धर्मांध लोकांच्या हातात जाऊ देणार नाही. आज दुर्दैवाने हा देश त्याच लोकांच्या हातात गेला आहे. बजरंग दल, विश्व हिंदू परिषद असेल संघ असेल यांचं स्वत:वरच नियंत्रण संपलेलं आहे. यांना फक्त दंगली घडवणं, हिंदू तरुणांची डोकी भडकवणं हेच करायचं आहे, असे संजय राऊत म्हणाले.
”या विकसीत कृषीप्रधान महाराष्ट्रात तीन हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत त्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने कधी आपली भूमिका मांडली आहे का? ज्यांना या देशावर राज्य करायचे आहे अशा संघाच्या सरसंघचालकांना कधी बेरोजगारी, महागाई, शेतकरी आत्महत्यांवर कधी बोलले आहेत का? असा सवाल संजय राऊत यांनी केला.
यावेळी त्यांनी मोहन भागवत यांच्या हिंदू मुसलमानांचे डिएनए सारखे आहेत या वक्तव्याचा देखील खरपूस समाचार घेतला. ”मोहन भागवत सतत वेगवेगळे स्टेटमेंट करत असतात. हिंदू मुसलमानांमध्ये वाद नाही, हिंदू मुसलमानांनी एकत्र काम करायला हवे. आमचा डिएनए एक आहे. हे जर मोहन भागवत सतत बोलत असतील तर त्याची अंमलबजावणी करणार कोण? भाजप त्यांचाच पक्ष आहे ना. तुमचा पक्ष सत्तेत आहे. कितीही तुम्ही नाकारलात तरी तो तुमचाच पक्ष आहे. तुमच्या नियंत्रणात आहे. ज्या प्रकारचे लोक तुमच्या पक्षात आले आहेत त्यांच्यावलर नियंत्रण कोण ठेवणार, त्यांच्या तोंडाला टाके कोण मारणार? असा सवाल देखील त्यांनी केला.
Comments are closed.