मंदिरावर ग्रेनेड हल्ल्याची सीबीआय चौकशीची मागणी
भाजपकडून हल्ल्याचा निषेध : सरकारवर टीकास्त्र
वृत्तसंस्था/ अमृतसर
अमृतसरच्या खंडवाला परिसरात असलेल्या ठाकुरद्वारा मंदिरावर मोटारसायकलवरून आलेल्या दोन तरुणांनी केलेल्या ग्रेनेड हल्ल्याचा भाजपने तीव्र निषेध केला आहे. तसेच केंद्रीय यंत्रणांकडून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. मंदिरावर झालेल्या ग्रेनेड हल्ल्याचा निषेध नोंदवण्यासाठी रविवारी येथे भाजपचे नेते एकवटले होते. याप्रसंगी या हल्ला प्रकरणाची सीबीआय तपास यंत्रणेकडून चौकशी करण्याची मागणी करण्यात आली.
खंडवाला परिसरात शनिवारी पहाटे झालेल्या हल्ल्यात मंदिराच्या काही भागाचे नुकसान झाले आहे. या घटनेत सीसीटीव्हीमध्ये हल्लेखोर कैद झालेले आहेत. दुचाकीवरून आलेल्या दोघांनी ही ग्रेनेडफेक केली असून त्यांचा नेमका थांगपत्ता अद्याप पोलिसांना लागलेला नाही. या घटनेशी संबंधित दोघांना बिहारमधून अटक करण्यात आली असून त्यांची चौकशी केली जात आहे.
मंदिरावर झालेल्या हल्ल्यानंतर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था योग्य असल्याचा दावा केला होता. मात्र, विरोधी पक्ष असलेल्या भाजपने सर्वसामान्य जनतेच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करतानाच आता मंदिरावरील हल्ल्याची केंद्रीय तपास यंत्रणांकडून चौकशी करण्याची आग्रही मागणी लावून धरली आहे. याप्रकरणी विधानसभेमध्येही आवाज उठवण्याची तयारी भाजपने केली आहे.
Comments are closed.