पुणेकरांनो, पुन्हा बसणार मणक्याला दणका! शहरातील 500 किलोमीटरचे रस्ते पुन्हा खोदणार

पुणे शहर पोलिसांकडून तब्बल 450 कोटी रुपये खर्च करून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केलेले सुमारे 1200 सीसीटीव्ही कॅमेरे शहरात बसविण्यात येणार आहेत. या सीसीटीव्हींच्या नेटवर्कसाठी तब्बल 500 किलोमीटरचे रस्ते खोदण्यात येणार आहेत. तर, यापूर्वीच ‘महाप्रीत’ लादेखील 500 हून अधिक किलोमीटर रस्तेखोदाईला परवानगी दिली आहे. त्यामुळे महापालिकेने केलेल्या ‘आदर्श’ रस्त्यांची वाट लागणार असतानाच पुणेकरांना वर्षभरात पुन्हा खड्ड्यांतून वाट काढावी लागणार आहे.
शहरात गेल्या पाच वर्षांत महापालिकेची समान पाणीपुरवठा योजना, तसेच खासगी मोबाईल कंपन्यांच्या खोदाईमुळे रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली होती. त्यामुळे महापालिकेकडून गेल्या पाच वर्षांत रस्त्यांच्या दुरुस्तीवर सुमारे 500 कोटींचा खर्च करण्यात आला आहे. त्यानंतर आता पुन्हा पोलिसांची 500 किलोमीटरची खोदाई होणार आहे. तर, महापालिकेडून शहरातील आपत्तिव्यवस्थापन कक्ष, ‘स्मार्ट सिटी’चे प्रकल्प, तसेच ‘एटीएमएस’ सिग्नल यंत्रणेसाठी 500 किलोमीटरची रस्तेखोदाई केली जाणार आहे. या कंपनीसही महापालिकेने परवानगी दिली आहे. त्यामुळे पोलीस आणि महापालिकेच्या खोदाईने पुढील वर्षभरात एक हजार किलोमीटरची रस्तेखोदाई होणार आहे. परिणामी, गेल्या पाच वर्षांत केलेल्या रस्तेदुरुस्तीचा खर्च वाया जाणार आहे.
दरम्यान, शहर पोलिसांकडून सीसीटीव्हींच्या नेटवर्कसाठी तब्बल 500 किलोमीटरचे रस्ते खोदण्यात येणार आहेत. हे सीसीटीव्ही बसविण्याचे काम देण्यात आलेल्या कंपनीकडून हे खोदाईचे प्रस्ताव महापालिकेकडे दाखल करण्यात आलेले आहेत. त्यानुसार पालिकेकडून जागेची पाहणीही करण्यात आले आहे. मात्र, खोदाई शुल्काबाबत शासनाकडून आदेश नसल्याचे सांगत पालिकेकडून या प्रस्तावांना अद्यापि मान्यता दिलेली नाही. या खोदाईचे तब्बल 600 कोटींचे शुल्क माफ करण्याच्या हालचाली सुरू आहेत. या खोदाईनंतरही संबंधित रस्त्यांची दुरुस्ती महापालिकेनेच करण्याचे प्रस्तावित आहे. त्यामुळे पुन्हा या रस्तेदुरुस्तीचा 200 ते 300 कोटींचा भार पालिकेलाच उचलावा लागणार आहे.
पुन्हा कंबरडे मोडणार
शहरात गेल्या पाच वर्षांत महापालिकेची समान पाणीपुरवठा योजना, तसेच खासगी मोबाईल कंपन्यांच्या खोदाईमुळे रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली होती. पुन्हा खोदलेले रस्ते पहिल्यासारखे एकसमान दुरुस्त होत नाहीत. त्यामुळे रस्तेखोदाईमुळे पुढील काही वर्षे पुन्हा पुणेकरांचे कंबरडे मोडणार असून, वाहनांचीदेखील वाट लागणार आहे.
Comments are closed.