शिवजयंतीनिमित्त शिवसेनेचा रोखठोक देखावा, कल्याणमध्ये गद्दारांविरोधात ज्वलंत चित्ररथ

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तिथीनुसार उद्या सोमवारी मोठ्या उत्साहात सर्वत्र साजरी करण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर कल्याणमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) रामबाग शाखेच्या वतीने गद्दारांचा समाचार घेणारा ज्वलंत चित्ररथ साकारला आहे. हा रोखठोक देखावा वाजतगाजत निघणाऱ्या मिरवणुकीत सहभागी होणार असून आतापासूनच तो चर्चेचा विषय ठरला आहे. छत्रपती संभाजी महाराज यांचा तेजस्वी इतिहास आणि आपल्याच माणसांनी केलेली गद्दारी या चित्ररथामध्ये अत्यंत प्रभावीपणे दर्शवण्यात आली आहे.
ऐतिहासिक कल्याण शहरात दरवर्षी शिवजयंतीची भव्य मिरवणूक निघते. यावर्षी शिवसेना उपनेते विजय साळवी यांच्या संकल्पनेतून गद्दारांचा रोखठोक समाचार घेणारा चित्ररथ बनवला आहे. त्यात औरंगजेबाच्या छाताडावर छत्रपती संभाजी राजे हातात तलवार घेऊन उभे असल्याचे दर्शवले आहे.
‘आपल्याच माणसांनी गद्दारी केली नसती तर आजचा इतिहास हा असता’ असे विधान संभाजी राजांनी केले आहे. तर या चित्ररथामध्ये सुधांशू त्रिवेदी, प्रशांत कोरटकर, मंगलप्रभात लोढा, श्रीपाद छिंदम, राहुल सोलापूरकर या वाचाळवीरांच्या प्रतिकृतींचा समावेश करण्यात आला.
दैवताचा अपमान करणाऱ्या हरामखोरांचा निषेध
शिवसेनेच्या या चित्ररथामध्ये गद्दारांवर प्रहार करण्यात आला आहे. ‘जिथे विजय अशक्य असतो तिथे गद्दारांची मदत घेतली जाते.. आमच्या लोकांत गद्दार नसते तर हिंदुस्थानचाच नव्हे, जगाचा इतिहास हा वेगळा असता’ या विधानाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्याचप्रमाणे ‘आमच्या दैवताचा अपमान करणाऱ्या हरामखोरांचा जाहीर निषेध’ अशा शब्दांत हिंदवी स्वराज्याशी गद्दारी करणाऱ्यांना फटकारले आहे. या चित्ररथावर मराठी अस्मितेचा मानबिंदू असलेल्या छत्रपती शिवरायांची भव्य प्रतिमा तमाम शिवप्रेमींना प्रेरणादायी ठरली आहे.
शिवसेना रामबाग शाखेने शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर जो चित्ररथ तयार केला आहे त्याच्या परवानगीचा अर्ज अद्यापि आमच्याकडे आलेला नाही. त्यात काही आक्षेपार्ह आढळून आले तर त्याबाबत विजय साळवी यांच्याशी आम्ही चर्चा करू व आक्षेपार्ह मुद्दे काढून टाकण्याची विनंती करू. – अतुल झेंडे (कल्याणचे पोलीस उपायुक्त)
Comments are closed.