दुर्गंधीने ठाणेकरांची ‘मुस्कटदाबी’; आधीच कचराकोंडी त्यात होळीची राख, निर्माल्याचे थर

सीपी टँक तलाव परिसरात कचरा टाकण्यास स्थानिकांनी विरोध केल्याने संपूर्ण ठाणे शहराची पुरती कचराकोंडी झाली आहे. चार ते पाच दिवसांनंतरही हा प्रश्न तडीस लावण्यात पालिका प्रशासनाला अपयश आले असून कोपरी ते घोडबंदर, वागळे इस्टेट ते मुंब्रा, दिव्यातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर कचरा साचलेला दिसून येत आहे. त्यामुळे प्रचंड दुर्गंधीने ठाणेकरांची अक्षरशः ‘मुस्कटदाबी’ झाली आहे. त्यातच होळीची राख आणि निर्माल्याचे थरदेखील न उचलल्याने पादचाऱ्यांना चालणे मुश्किल झाले आहे. महापालिकेच्या ढिसाळ कारभारामुळेच ही भयंकर परिस्थिती निर्माण झाल्याची टीका ठाणेकरांनी केली आहे.
ठाणे शहरात रोज जमा होणारा हजारो मेट्रिक टन कचरा वागळे येथील सीपी तलाव संकलन केंद्रावर आणण्यात येतो. येथे कचऱ्याचे वर्गीकरण होऊन पुढील कचरा विल्वेवाट व पुनर्प्रक्रिया केंद्रावर नेला जातो. पण दिवा येथील डम्पिंग घाईत बंद करण्यात आले. त्यातच राज्य शासनाने भिवंडीत 35 एकर भूखंड कचरा प्रकल्पासाठी देऊनही राजकीय विरोधामुळे तो सुरू होऊ शकला नाही. त्यामुळे शहरात गोळा होणारा सर्व कचरा सीपी तलाव परिसरात टाकला जात असल्याने या भागाचे रूपांतर डम्पिंग ग्राऊंडमध्ये झाले आहे. कचऱ्याच्या या डोंगराने स्थानिकांचे डोके भणभणले असून रहिवाशांनी एकही घंटागाडी येऊ देणार नाही, असा इशारा स्थानिक नागरिक आणि लोकप्रतिनिधींनी महापालिका प्रशासनाला दिला होता. यामुळे प्रशासनाने कचरा उचलण्यास बंद केल्याने ठाण्याची कचराकोंडी झाली आहे.
सीपी टॅकची आयुक्तांनी केली पाहणी
शहरातील कचराकोंडी दूर करण्यासाठी महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सीपी टँक डम्पिंग ग्राऊंडची पाहणी केली. यावेळी आतकोली क्षेपणभूमीवर हस्तांतरण सुरू झाले असून साठलेला कचरा त्याठिकाणी पाठवण्यासाठी केलेल्या नियोजनाचा त्यांनी आढावा घेतला. आतापर्यंत 90 वाहनांच्या मदतीने सुमारे सात हजार मेट्रिक टन कचरा सीपी टँक येथून आतकोली क्षेपणभूमीवर पाठवण्यात आला असल्याची माहिती यावेळी आयुक्तांनी दिली. दरम्यान घरोघरी घंटागाड्यांमार्फत होणारे कचरा संकलनाचे काम तत्काळ सुरू करण्याचे निर्देश आयुक्त सौरभ राव यांनी घनकचरा विभागाला दिले आहेत.
■ ठाणे पालिकेने आतकोली येथे तात्पुरत्या स्वरूपात कचरा टाकण्यास सुरुवात केली आहे. मात्र ठाणे शहरात जमा होणारा कचरा आधी संकलन केंद्रावर वर्गीकरण होणे आवश्यक आहे. त्यानंतर मोठ्या कॉम्पेक्टरमधून तो क्षेपणभूमी किंवा पुनर्प्रक्रिया केंद्रात पोहोचवणे अपेक्षित आहे. परंतु असे होत नसल्याचा आरोप होत आहे.
■ शहरात सर्वत्र रस्त्यावर कचरा साचल्याचे चित्र दिसून येत आहे. या साचलेल्या कचऱ्याने संपूर्ण परिसरात दुर्गंधी पसरली आहे. रस्ते, गृहसंकुले, मोकळ्या जागा सर्वत्र कचऱ्याने व्यापून गेल्या आहेत. त्यातच होळीची राख आणि निर्माल्यही ठिकठिकाणी पडले असल्याने त्यातून वाट काढताना पादचाऱ्यांच्या नाकीनऊ येत आहे.
■ सध्या विविध ठिकाणी स्थानिक पातळीवर होत असलेल्या विरोधामुळे पालिकेकडे कचरा हस्तांतरित करण्याकरिता जागाच नाही. त्यावर वरिष्ठ पातळीवर उपाय योजना करण्याबाबत प्रयत्न सुरू आहेत. लवकरच ही समस्या सुटेल, अशी माहिती उपायुक्त मनीष जोशी यांनी दिली.
Comments are closed.