मंगेश कुडाळकर यांच्या आमदारकीला आव्हान, दोन आठवड्यांत उत्तर दाखल करा; हायकोर्टाचे कुडाळकर यांना आदेश

सत्ता उपभोगणाऱ्या भाजप, मिंधे गटाच्या आमदारांनी भ्रष्ट मार्गाने निवडणूक जिंकली, असा आरोप करत हायकोर्टात आमदारांच्या निवडीविरोधात विविध याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. मिंधे गटाचे आमदार मंगेश कुडाळकर यांनीही अनैतिक मार्गाने निवडणूक जिंकली असा दावा करत शिवसेनेने दाखल केलेल्या याचिकेची आज हायकोर्टाने गंभीर दखल घेतली. या याचिकेप्रकरणी दोन आठवड्यांत उत्तर सादर करा, असे आदेश न्यायालयाने आमदार कुडाळकर यांना दिले.

भाजप-मिंधे गटाच्या उमेदवारांनी सत्तेचा गैरवापर, भ्रष्टाचार करून विधानसभा निवडणुकीत विजय मिळवल्याचा आरोप केला जात आहे. कुर्ला विधानसभा मतदारसंघाचे मिंधे गटाचे आमदार मंगेश कुडाळकर यांच्या विरोधात शिवसेनेच्या उमेदवार प्रवीणा मोरजकर यांनी अ‍ॅड. नीलेश पांडे व अ‍ॅड. समीर विसपुते यांच्यामार्फत याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आज न्यायमूर्ती शिवकुमार दिघे यांच्या एकलपीठासमोर सुनावणी झाली. गेल्या सुनावणीवेळी न्यायालयाने आमदार मंगेश कुडाळकर यांना समन्स बजावले होते. आज सोमवारी झालेल्या सुनावणीवेळी न्यायालयाने शिवसेनेच्या याचिकेची गंभीर दखल घेत कुडाळकर यांना दोन आठवड्यांत उत्तर सादर करण्याचे आदेश दिले.

Comments are closed.