‘जय भवानी, जय शिवाजी’ जयघोषाने अवघा विमानतळ परिसर दुमदुमला, उद्धव ठाकरे यांनी केले अभिवादन

हिंदवी स्वराज्य संस्थापक, क्षत्रियकुलावतंस, सिंहासनाधीश्वर छत्रपती शिवाजी महाराज की जय, अशा गगनभेदी जयघोषाने आज आंतरराष्ट्रीय विमानतळाचा परिसर दुमदुमला. भगव्या शिवमय वातावरणात पश्चिम द्रुतगती महामार्गालगत विलेपार्ले येथे आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ असलेल्या शिवरायांच्या भव्य पूर्णाकृती पुतळ्याजवळ शिवजयंती जल्लोषात साजरी केली गेली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यावेळी उपस्थित राहून शिवरायांना अभिवादन केले.

भारतीय कामगार सेनेच्या वतीने दरवर्षी आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळील शिवरायांच्या पुतळ्याजवळ शिवजयंती साजरी केली जाते. यंदाही मोठ्या दिमाखात शिवजयंती उत्सव साजरा केला गेला. उद्धव ठाकरे यांनी शिवरायांना फुले अर्पण करून त्यांना वंदन केले. यावेळी त्यांच्यासोबत भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष, शिवसेना नेते, खासदार अरविंद सावंत, शिवसेना नेते, आमदार अ‍ॅड. अनिल परब, उपनेते-आमदार सचिन अहिर, आमदार वरुण सरदेसाई, महेश सावंत, भारतीय कामगार सेनेचे कार्याध्यक्ष अजित साळवी, संयुक्त सरचिटणीस संजय कदम यांच्यासह भारतीय कामगार सेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवसैनिक आणि हजारो शिवप्रेमी नागरिक आदी उपस्थित होते.

या उत्सवासाठी पुतळ्याजवळचा परिसर आकर्षक भगव्या फुलांनी सजवण्यात आला होता. किल्ल्याच्या पार्श्वभूमीवर शिवरायांचा उभा पूर्णाकृती पुतळा सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. उत्सवस्थळी शिवकालीन वेषातील मावळे तैनात करण्यात आले होते. उपस्थित शिवसैनिकांनी भगव्या टोप्या, फेटे आणि उपरणी परिधान केली होती. भगव्या झेंड्यांनी परिसर भगवामय झाला होता. ढोलताशांचा गजर, तुतारींचा निनाद आणि बँडवर वाजणाऱ्या शिवपराक्रमाच्या गीतांनी वातावरण भारले होते. शिवजयंतीनिमित्त मंत्रघोषात शिवरायांचे पूजन करण्यात आले.

Comments are closed.