रायसिना संवादात जागतिक नेते भेटतात

पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन : न्यूझीलंडचे पंतप्रधान प्रमुख पाहुणे : अमेरिकेच्या सीआयए प्रमुख तुलसी गब्बार्ड यांचीही उपस्थिती

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी तीन दिवसांच्या ‘रायसीना संवाद’चे (डायलॉग) उद्घाटन केले. ही परिषद 17 ते 19 मार्च दरम्यान आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेत 125 देशांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.  भू-राजनीती आणि भू-अर्थशास्त्र या विषयावरील ही भारतातील प्रमुख परिषद आहे. परिषदेच्या 10 व्या आवृत्तीत न्यूझीलंडचे पंतप्रधान क्रिस्टोफर लक्सन, अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तचर संचालक तुलसी गब्बार्ड आणि युक्रेनचे परराष्ट्रमंत्री आंद्रेई सिबिहा हेदेखील सहभागी झाले आहेत. त्याव्यतिरिक्त पहिल्यांदाच तैवानमधील एका वरिष्ठ सुरक्षा अधिकाऱ्यासह एक शिष्टमंडळ या परिषदेत उपस्थित राहणार आहे. हे गेल्या काही वर्षांत दोन्ही देशांमधील वाढत्या सहकार्याचे प्रतिबिंब आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी सायंकाळी नवी दिल्ली येथे 10 व्या रायसीना संवादाच्या उद्घाटनाला उपस्थिती दर्शवली. परिषदेचे उद्घाटन झाल्यानंतर न्यूझीलंडचे पंतप्रधान क्रिस्टोफर लक्सन यांनी प्रमुख पाहुणे म्हणून शिखर परिषदेला संबोधित केले. भारताला इंडो-पॅसिफिक क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावावी लागेल. इंडो-पॅसिफिकमधील आपल्या हितासाठी न्यूझीलंड भारतासारख्या भागीदारांच्या शोधात आहे, असे त्यांनी नमूद केले.

125 देशांचे प्रतिनिधी उपस्थित

या वर्षीच्या रायसीना संवादाची थीम ‘कालचक्र – लोक, स्थान आणि ग्रह’ अशी आहे. ही परिषद परराष्ट्र मंत्रालयाच्या भागीदारीत थिंक टँक ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशनने आयोजित केली आहे. सुमारे 125 देशांतील 3,500 हून अधिक प्रतिनिधी यात सहभागी होतील. वेगवेगळ्या देशांच्या प्रतिनिधींमध्ये मंत्री, माजी राष्ट्रप्रमुख, लष्करी कमांडर, आघाडीचे उद्योगपती, तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज, शिक्षणतज्ञ, पत्रकार, धोरणात्मक बाबींचे अभ्यासक आणि आघाडीच्या थिंक टँकमधील तज्ञांचा समावेश आहे. महत्त्वाचे म्हणजे 20 देशांचे परराष्ट्रमंत्री या चर्चेत सहभागी झाले आहेत.

Comments are closed.