देवगड हापूस 20 हजार रुपये पेटी

शहरातील सातारा बाजार समितीच्या आवारात देवगड हापूस आंब्याच्या पहिल्या पटीचे दणक्यात आगमन झाले असून या पेटीसाठी एका व्यापाऱयाने तब्बल 20 हजार रुपयांची उच्चांकी बोली लावली आहे. ही मानाची पहिली पेटी ताब्यात घेताना फटाके वाजवून जल्लोष साजरा करण्यात आला.

मुंबई, पुणे बाजारात काही दिवसांपूर्वी हापूस आंब्याची पहिली पेटी दाखल झाली होती. त्याला उच्चांकी दर मिळाला होता. आता साताऱयात देवगड हापूस दाखल झाला आहे. यंदा फळांचा राजा देवगड हापूस आंब्याला मोहोराने दगा दिल्याने केवळ 30 टक्केच आंब्याचे उत्पादन होणार आहे. बदलत्या हवामानाने हा घात केला असून तिसऱया टप्प्यातील मोहोरही गायब झाला आहे. यामुळे सर्वसामान्यांना स्वस्तात हापूस उपलब्ध होण्यासाठी मे महिन्याची वाट पाहावी लागणार आहे. मार्च उजाडला तरीदेखील 1 डझन आंब्याची किंमत 1800 रुपयांपर्यंत आहे. आंब्याचे उत्पादन कमालीचे घटल्याने आंबा हंगाम लवकर संपण्याची शक्यता आहे.

15 एप्रिलनंतरच दर उतरणार

नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात मोहोर आला, मात्र अनुकूल वातावरण नसल्यामुळे व वांझ मोहोराचे प्रमाण जास्त असल्यामुळे पहिल्या टप्प्यात आंब्याचे उत्पादन 2 ते 3 टक्केच झाले आहे. त्यामुळे मार्च महिन्यात आंबा सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर राहणार आहे. 15 एप्रिलनंतर हापूसचे दर कमी होण्याची शक्यता आहे.

Comments are closed.