मंदिरात ग्रेनेड हल्लेखोरांशी सामना

दुसरा संशयित फरार : पंजाब पोलिसांची कारवाई

वृत्तसंस्था/ अमृतसर

पंजाबमधील अमृतसरमधील मंदिरावर झालेल्या ग्रेनेड हल्ल्यातील मुख्य संशयित आरोपीला ठार मारण्यात आले आहे. सोमवारी सकाळी पोलिसांनी त्याला चकमकीत ठार केले. सदर आरोपीचे नाव गुरसिदक सिंग असे होते. गुरसिदकचा साथीदार विशाल घटनास्थळावरून पळून गेला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. पोलिसांनी एक निवेदन जारी करून चकमकीची माहिती दिली आहे.

पंजाब पोलिसांनी अमृतसरमधील ठाकुरद्वारा मंदिरावरील ग्रेनेड हल्ल्याचे प्रकरण 48 तासांच्या आत उलगडले आहे. गुरसिदक आणि त्याचा साथीदार विशाल राजासांसी परिसरात लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या दोघांवर मंदिरावरील ग्रेनेड हल्ल्याचा आरोप होता. पोलिसांनी परिसरात शोधमोहीम सुरू केल्यानंतर पोलीस आणि आरोपींमध्ये चकमक झाली. या चकमकीत गुरसिदकला गोळी लागली. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, परंतु त्याचा जीव वाचू शकला नाही. दुसरा संशयित आरोपी विशाल अजूनही पोलिसांच्या कचाट्यात सापडलेला नाही. पोलीस त्याला पकडण्यासाठी सतत प्रयत्न करत आहेत.

गुरसिदक आणि विशाल हे दोन्ही आरोपी राजासांसी परिसरात आश्रयास असल्याची माहिती पोलिसांना गोपनीय सूत्रांकडून प्राप्त झाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी कारवाई करत गुरसिदकला ठार मारले. मोहिमेदरम्यान एसएचओ चेहर्ता यांनी आरोपीची मोटारसायकल थांबवण्याचा प्रयत्न केला तेव्हा आरोपीने त्याची मोटारसायकल सोडून पोलिसांवर गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तरादाखल, मुख्य आरोपी गुरसिदकवर गोळी झाडली. गुन्हेगारांनी केलेल्या गोळीबारात दोन पोलीस जखमी झाले. इन्स्पेक्टर विनोद कुमार यांनी स्वसंरक्षणार्थ आपल्याकडील पिस्तूलमधून गोळीबार केल्याचे सांगण्यात आले. हेड कॉन्स्टेबल गुरप्रीत सिंग यांना उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

पाकिस्तानशी कनेक्शन

सूत्रांच्या माहितीनुसार, हल्लेखोरांचे पाकिस्तानी गँगस्टर आणि आयएसआयशी संबंध असल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झाली असून त्याची सखोल चौकशी सुरू आहे. या हल्ल्यामागील सूत्रधार म्हणून पाकिस्तानी डॉन शहजाद भट्टीचे नाव पुढे येत आहे. त्याने स्वत: या हल्ल्याचा कथित व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत हा हल्ला पाच तरुणांनी मिळून केल्याचे म्हटले होते. या हल्ल्याच्या मुळाशी जाण्यासाठी जालंधर पोलिसांनी संपूर्ण तपास सुरू केला आहे. शहजाद भट्टी याच्या सोशल मीडिया पोस्टचीही चौकशी केली जात आहे.

Comments are closed.