Nagpur violence नागपूरमधील दंगलग्रस्त भागात संचारबंदी लागू, शहरात तणावपूर्ण शांतता

औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रात राजकारण सुरू असून नागपुरात (Nagpur violence) त्याचे पडसाद उठल्याचे पाहायला मिळाले. औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीवरून सोमवारी, 17 मार्च रोजी दिवसभर राज्याच्या विविध भागांमध्ये निदर्शने सुरू होती. त्यानंतर रात्री नागपुरात मोठा तणाव निर्माण झाला. दोन गटात झालेल्या दगडफेक आणि जाळपोळीच्या घटनांनी नागपूर हादरले आहे. सध्या नागपुरात तणावपूर्ण शांतता असल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान, कलम 163 अंतर्गत नागपूर शहरातील अनेक भागात संचारबंदी लागू करण्यात आली आहे, असे वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने दिलं आहे.

रात्री दोन गटात निर्माण झालेला तणाव आणि उसळलेली दंगल यानंतर पोलिसांनी कारवाई करत जमावाला पांगवले. जागोजागी पोलिसांच्या तुकड्या उभ्या करून परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला आहे. नागपूर पोलीस आयुक्त रविंदर कुमार सिंगल यांनी जारी केलेल्या अधिकृत आदेशानुसार, पुढील सूचना मिळेपर्यंत निर्बंध लागू राहतील. कोतवाली, गणेशपेठ, तहसील, लकडगंज, पाचपावली, शांतीनगर, सक्करदरा, नंदनवन, इमामवाडा, यशोधरानगर आणि कपिलनगर येथील पोलीस ठाण्यांच्या हद्दीत संचारंबदी लागू करण्यात आली आहे.

नागपूर शहरातील कोतवाली, गणेशपेठ, लकडगंज, पाचपावली, शांतीनगर, सक्करदरा, नंदनवन, इमामवाडा, यशोधरा नगर आणि कपिल नगर या पोलिस ठाण्यांच्या हद्दीत कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. पुढील आदेश येईपर्यंत हा कर्फ्यू लागू राहील: डॉ. रविंदर कुमार सिंगल, पोलीस आयुक्त, नागपूर

तसेच काही जणांवर कारवाई करण्यात आली असून अन्य आरोपींवर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती देखील पोलीस आयुक्तांनी दिली.

Comments are closed.