चेन्नईचा थाला सज्ज! धोनीचा सराव पाहून प्रतिस्पर्धी संघ चिंतेत
भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने 2019 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला होता, मात्र तो अजूनही आयपीएलमध्ये आपले वर्चस्व दाखवत आहे. वयाच्या 43व्या वर्षीही त्याची फलंदाजी आणि तंदुरुस्ती आश्चर्यचकित करणारी आहे. चेन्नई सुपर किंग्जने (CSK) त्याला 2025 च्या मेगा लिलावात 4 कोटी रुपयांत अनकॅप्ड खेळाडू म्हणून कायम ठेवले आहे. यावरूनच त्याचे महत्त्व संघासाठी किती मोठे आहे हे स्पष्ट होते.
2024 च्या हंगामात धोनीने 14 सामन्यांत 161 धावा केल्या आणि 13 षटकार ठोकले. आता 2025 च्या हंगामासाठी तो तयारीला लागला आहे. चेन्नईच्या कॅम्पमध्ये तो नेहमीप्रमाणे सर्वांत आधी पोहोचतो आणि तासन्तास सराव करतो. त्याच्या बॅटमधून निघणारे फटके पाहून विरोधी संघांना पुन्हा एकदा धोनीचा प्रभाव जाणवू लागला आहे. दरम्यान माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग आणि आकाश चोप्रा यांनी धोनीच्या फिटनेसबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
माजी खेळाडू हरभजन सिंगने धोनीबद्दल सांगितले की, “मी त्याला एका लग्नात भेटलो. तो खूप तंदुरुस्त आणि उत्साही दिसत होता. मी विचारलं, ‘तुला अजूनही क्रिकेटमध्ये एवढा वेळ द्यायला जड जात नाही का?’ तो म्हणाला, ‘हो, कठीण असतं. पण मला क्रिकेट आवडतं आणि मी हे आनंदाने करतो.’ यावरूनच कळते की धोनी केवळ खेळाडू नाही, तर एक प्रेरणास्रोत आहे.”
धोनीच्या खेळाची तत्त्वं वेगळी आहेत. क्रिकेट विश्लेषक आणि माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रा म्हणला, “धोनीला स्वतःच्या ताकदीची आणि मर्यादेची पूर्ण जाणीव आहे. अनेकदा लोक म्हणतात की तो वरच्या क्रमांकावर का फलंदाजी करत नाही, पण त्याला माहित आहे की 40 चेंडू खेळणं शक्य नाही. स्वतःच्या मर्यादा जाणून घेणंही महत्त्वाचं असतं.”
आयपीएल 2025 मध्ये धोनीच्या मार्गदर्शनाखाली चेन्नई पुन्हा विजेतेपदासाठी सज्ज होईल का, याची उत्सुकता सर्वांनाच आहे. त्याचा अनुभव, कूल अंदाज आणि धडाकेबाज फलंदाजी यामुळे तो यंदाही चाहत्यांचे मन जिंकणार यात शंका नाही. मैदानावर हेलिकॉप्टर शॉट्स पाहायला चाहते उत्सुक आहेत.
Comments are closed.