घरी ब्रेनस्ट्रोक झालेले आजोबा, आई एकटीच घरी, कॉलेजला गेलेल्या आस्थासोबत नागपूर दंगलीत काय घडलं?
नागपूर हिंसा: महाविद्यालयीन शिक्षण घेणारी तरुण मुलगी घराबाहेर असेल आणि घराच्या प्रवेश दारावर दंगल उसळली असेल, तर तिच्या आईवर काय परिस्थिती उद्भवेल याची कल्पनाही आपण करू शकत नाही. अशीच परीस्थिती स्वाती दहीकर यांच्यावर ओढवली होती. त्यांची मुलगी आस्था कॉलेजमधून परत येत असताना स्वाती यांच्या वस्तीत मोठी दगडफेक आणि गाड्यांची तोडफोड सुरू झाली. अशा अवस्थेत मुलीला अनेक फोन करून लवकर घरी बोलावलं. मुलगी घराच्या आत शिरताच घरावर मोठ्या प्रमाणावर दगडांचा वर्षाव झाला. कालची परिस्थिती सांगताना स्वाती यांचे अश्रू अनावर झाले.
तर मुलगी आस्थाही कशा भयावह परिस्थितीत घरापर्यंत पोहोचली याचे कथन तिने एबीपी माझाशी बोलताना केलंय. अगदी रस्त्यात जीवे मारण्याची धमकी दिली जात असताना कसतरी घरी पोहोचल्याच तिनं बोलताना सांगितलंय.
घरी ब्रेन स्ट्रोक झालेले आजोबा आतल्या खोलीत असताना बाहेर दंगल सदृश परिस्थिती निर्माण झाल्यानंतर ही दहीकर कुटुंबाने बाहेर काय सुरू आहे, हे सांगितलं नव्हतं. अजूनही त्यांना काल वस्तीत काय घडलं हे सांगितलं नाही. त्यांच्यासमोर जाताना चेहऱ्यावर हास्य घेऊनच जावं लागत आहे, अशा परिस्थितीत हे कुटुंब जगतय.
आमची रिक्षा अडवून जमावाकडून जीवे मारण्याची धमकी
मी शुक्रवारी तलावाकडून घरी येत होती. त्यावेळी जमावाचा मोठा उद्रेक झाल्याचं दिसून आलं. ज्यावेळी मी माझ्या रिक्षातून घरी जात होते त्यावेळी आमची रिक्षा अडवून मला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. तरीही मार्ग काढत आम्ही घरी जाण्यासाठी निघालो. त्यावेळी चिटणीस पार्क येथे जवळ जवळ 800 ते 900 लोकांचा जमाव जमला होता. त्यातूनही मी घरी निघाले तेव्हा आमच्या घराच्या गल्लीत घोषणाबाजी आणि शिवीगाळ सुरू होती. जसं- कसं मी घरी आले आणि दरवाजा बंद केला तर गल्लीत तोडफोड आणि शिवीगाळ सुरू झाली. परिसरातील अनेक गाड्या तोडल्या, आमच्या घरातील कुलर तोडला, अनेकांचे नुकसान केलं.
या एकंदरीत परिस्थितीमुळे आम्ही फार भयभीत झालो असल्याचा थरारक अनुभव आस्था दहीकर या राड्या दरम्यान अडकलेल्या मुलीने एबीपी माझाशी बोलताना सांगितला आहे. तर घडलेला प्रकार हा सूनियोजित असल्याची शक्यता आहे. कारण इतक्या मोठ्या प्रमाणात दगडी आल्या कुठून? परिसरात कुठेही एवढ्या मोठ्या प्रमाणात दगड नाहीत, लाठ्या-काठ्या नाहीत, मग हे सुनियोजित नाही तर काय? असा आरोपही तीने केला आहे.
नुकताच माझ्या वडिलांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज
या सगळ्यामध्ये मी अतिशय भयभीत झाली असून प्रचंड तणावात होते. माझ्या मुलीला दर दोन मिनिटांनी मी फोन करून ती कुठे आहे, याबद्दल विचारणा करत होती. सोबतच मनात देवाचा धावा करत होती. कालाची परिस्थिती ही आमच्यासाठी अतिशय वाईट अशी होती. घरात माझे पती नव्हते. माझे वडील नुकतेच ब्रेन स्ट्रोकच्या आजारातून उठले आहेत. त्यांना या एकंदरीत परिस्थितीची आम्ही चूनूकही लागू दिली नाही. समाजा त्यांना ही परिस्थिती माहिती झाली असती तर त्यांचे बीपी वाढण्याचा धोका निर्माण झाला असता. एक ना अनेक विचारांचे काहूर डोक्यात माजल्याने मी अतिशय भयभीत झाले होते.
अक्षरश: मी दाराला पकडून होते. शनिवारीच माझ्या वडिलांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला. डॉक्टरांनी त्यांना पूर्णपणे आरामाचा सल्ला दिला असून कुठल्याही तणाव त्यांना न घेण्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. अशा प्रसंगाला तोंड देताना मी अतिशय संकटात सापडले असल्याची प्रतिक्रिया स्वाती दहीकर यांनी दिली आहे. यावेळी बोलताना त्यांना अश्रू आनावर झाले होते.
अधिक पाहा..
Comments are closed.