छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानाची भाजपने माफी मागायला हवी, संजय राऊत यांनी फटकारले

भाजप खासदार प्रदीप पुरोहित यांनी सोमवारी संसदेत भाषण करत असताना मागच्या जन्मी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे छत्रपती शिवाजी महाराज होते, असे वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यावरून महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते व खासदार संजय राऊत यांनी या वक्तव्यावरून भाजपला फटकारले आहे. तसेच या अपमानासाठी भाजपने माफी मागायला हवी अशी मागणी देखील केली आहे.

संजय राऊत यांनी खासदार प्रदीप पुरोहित यांचा संसदेतील भाषणाचा व्हिडीओ ट्विटरवर शेअर करत भाजपवर निशाणा साधला. ”हे महाशय संसदेत सांगतात की मोदी पूर्वजन्मी छत्रपती शिवाजी महाराज होते. आता ते मोदी बनले आहेत. म्हणजे भाजपाचे नेते खऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना मानत नाही. त्यांच्यासाठी मोदीच शिवाजी महाराज आहेत. कुठून जन्माला येतात अशी लोकं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानाची भाजपने माफी मागायला हवी, असा संताप संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.

Comments are closed.