नागपूरात अशी घटना घडेल असे कधीही वाटलं नव्हतं; प्रभावित क्षेत्रास जाणे योग्य नाही: पालकमंत्री

Chandrashekhar Bawankule on Nagpur Violence : संचारबंदी लागू केलेली असताना काल (सोमवार 17 मार्च) दगडफेक, जाळपोळ (Nagpur Violence) झालेल्या भागात जाणे योग्य नाही, असे सांगत पालकमंत्री आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी प्रभावित क्षेत्रास न जाण्याचे ठरवले आहे. त्या ठिकाणी पाहणी करायला गेले असता पोलिसांवरचा नाहक ताण वाढेल, असं चंद्रशेखर बावनकुळे यांचं म्हणणं आहे. एबीपी माझाशी दूरध्वनीवर बोलताना बावनकुळेंनी ही माहिती दिली आहे. पोलिसांची माहिती घेतल्यानंतर बावनकुळे आता जखमी पोलिसांची भेट घेण्यासाठी रुग्णालयात पोहोचले असून त्यांची विचारपूस चंद्रशेखर बावनकुळे  यांच्या कडून करण्यात येत आहे.

नागपूरात अशी घटना घडेल असे कधीही वाटलं नव्हतं- चंद्रशेखर बावनकुळे

यापूर्वी कधीही न बघितलेली घटना काल सोमवारी नागपुरात घडली आहे. या सर्व घटनेमध्ये सर्व समाज बांधवानी शांतता प्रस्थापित करून मूळ समाजकंटक आहे यांचा शोध घेतला पाहिजे आणि त्याच्यासाठी पोलीस आणि प्रशासनाला सहकार्य केलं पाहिजे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कालपासून या घटनेत जातीने लक्ष घातले आहे. या घटनेला ताबडतोब थांबवण्याचे आणि त्याचे इतरत्र पडसात उमटू नये यासाठी पोलीस प्रशासन तत्पर आहे. पोलिसांनी पूर्ण तात्परतेने ही परिस्थिती हाताळली आहे. मात्र जवळपास 34 पोलीस अधिकारी आणि पोलीस शिपाई यामध्ये जखमी झाली असल्याची माहिती आहे.

किंबहुना या घटनेत सर्वाधिक पोलिसांना जखमी व्हावे लागले आहे. मुळात कालपासून सोशल मीडियाच्या माध्यमातून नागपुरातील वातावरण बिघडवण्याचे काम करण्यात आलंय. खरं तर पोलिसांनी हे प्रकरण ज्या पद्धतीने हाताळलं त्याबद्दल त्यांचे मला अभिनंदन करायचे आहे. वेळीच ही घटना आटोक्यात आणल्याने ही परिस्थिती हाता बाहेर गेली नाही. असे म्हणत राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूर हिंसाचार प्रकरणावर भाष्य केले आहे.

नागपूरचे सांस्कृतिक वैभव अबाधित राहावं

नागपूरमध्ये सर्व समाजाने एकत्र येऊन नागपूरचा सांस्कृतिक वैभव जपले आहे. तो पुढे देखील अबाधित राहावं यासाठी मी जनतेला आणि सर्व समाज बांधवांना आवाहन करतो आहे. सोबतच विरोधी पक्षातील नेत्यांनाही माझे आवाहन आहे की या घटनेला राजकीय रंग देऊ नये. या घटनेमध्ये राजकीय किंवा कुठला समाजाचा दोष नसतो तर अशा घटना या समाजकंटकांकडून होत असतात. सरकार म्हणून यात आम्ही कठोर भूमिका घेतली आहे. त्यामुळे सर्वांनी पोलिसांना सहकार्य करून सलोखा कायम ठेवावं असे आवाहन ही चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी केलं आहे.

हे ही वाचा

अधिक पाहा..

Comments are closed.