पोलीसच असुरक्षित! नागपूर दंगलीत उपायुक्तावर कुऱ्हाडीने हल्ला, तीन DCP जखमी; मुख्यमंत्र्यांचे धक्कादायक निवेदन

नागपूरमध्ये सोमवारी झालेल्या दंगलीवरून विरोधकांनी विधिमंडळात सरकारला धारेवर धरले. अखेर नागपूर दंगलीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत निवेदन दिले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये काय घडले आणि सध्ययाची परिस्थिती काय आहे? याची माहिती दिली. नागपूर दंगलीत तीन पोलीस उपायुक्त जखमी झाले असून त्यापैकी एका पोलीस उपायुक्तावर थेट कुऱ्हाडीने हल्ला झाल्याची धक्कादाय माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.

https://www.youtube.com/watch?v=8szrupfpawm

नागपूरमध्ये (सोमवारी 17 मार्च 2025) सकाळी साडे अकरा वाजता महाल परिसरात विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी औरंगजेबाची कबर हटाव… असे नारे देत आंदोलन केले. हे आंदोलन करताना त्यांनी गवताच्या पेंढ्या असलेली प्रतिकात्मक कबर जाळली. यानंतर गणेशपेठ पोलिसांनी आंदोलकांवर गुन्हा दाखल केला. दुपारी 3.9 मिनिटांनी हा गुन्हा दाखल झाला. यानंतर संध्याकाळी एक अफवा पसरवली गेली. सकाळच्या आंदोलनात जी प्रतिकात्मक कबर जाळली त्याच्या कापडावर धार्मिक मजकूर होता, अशी ही अफवा होती. अत्तर रोडमधील नमाज आटोपून दोनशे ते अडीचशेचा जमाव त्या ठिकाणी तयार झाला आणि नारे देऊ लागला. याच लोकांनी आग लावून टाकू… असे हिंसक बोलणे प्रारंभ केले. यामुळे पोलिसांनी बळाचा वापर केला, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी निवेदनात म्हटले.

राज्यातील कायदा व सुव्यस्था कधी नव्हे इतकी ढासळलीय, आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारला फटकारले

यापूर्वी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांविरुद्ध तक्रार द्यायची आहे, अशी मागणी करण्यात आल्याने त्यांना गणेशपेठ पोलीस ठाण्यात आमंत्रित करण्यात आलं. त्यांची तक्रार ऐकून घेण्यात आली. एकीकडे पोलिसांची कारवाई सुरू असताना दुसरीकडे हंसापुरी भागामध्ये दोनशे ते तीनशे लोक हातात काठ्या घेऊन दगडफेक करू लागले. त्यांच्या तोंडावर फडके बांधले होते. या घटनेत बारा दुचाकींचे नुकसान झाले आहे. या घटनेत काही लोकांवर घातक शस्त्राने हल्ला करण्यात आला, असे मुख्यमंत्री म्हणाले.

तिसरी घटना भालदारपुरा भागात संध्याकाळी साडेसात वाजता झाली. 80 ते 100 लोकांचा जमाव तिथे होता. त्यांनी पोलिसांवर हल्ला केला. त्यामुळे पोलिसांना अश्रुधूर व सौम्य बळाचा वापर करावा लागला. या घटनेत एक क्रेन, दोन जेसीबी व काही चारचाकी वाहने ही जाळण्यात आली. या संपूर्ण घटनेत 33 पोलीस जखमी झाले आहेत. यामध्ये तीन उपायुक्त दर्जाचे पोलीस आहेत. त्यातल्या एका पोलीस उपायुक्तावर कुऱ्हाडीने हल्ला करण्यात आला आहे. एकूण 5 नागरीक जखमी झाले आहेत. तिघांना उपचार करून सोडलं आहे. दोन रुग्णलायत आहेत. त्यातील एक आयसीयूत आहेत. एकूण तीन गुन्हे गणेशपेठ पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत. तहसील पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. एकूण पाच गुन्हे आहेत. 11 पोलीस ठाण्याच्या हद्दीत संचारबंदी लागू आहे. एन्ट्री पॉइंटवर नाकाबंदी केली आहे. एसआरपीएफच्या पाच तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. राज्याच्या पोलीस महासंचालकांनी सर्व पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक यांची व्हीसी घेऊन राज्यभर कायदा आणि सुव्यवस्थेचे निर्देश दिले आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

तीन डीसीपी दर्जाचे अधिकारी या ठिकाणी जखमी झालेले आहेत. यातील एका डीसीपीवर थेट कुऱ्हाडीने वार करण्यात आला आहे. त्यामुळे यामध्ये एक प्रकारे काही लोकांचा सुनियोजित पॅटर्न दिसतोय. अशा लोकांवर कारवाई केली जाईल. कुठल्याही परिस्थितीत कायदा आणि सुव्यवस्था हाती घेण्याची कोणालाही परवानगी नाही. पोलीसांवर ज्यांनी हल्ला केला असेल त्यांना काहीही झालं तरी सोडणार नाही. पोलिसांवरचा हल्ला सहन केला जाणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Comments are closed.