दिलीप वेंगसरकर, डायना एडुल्जी यांना जीवनगौरव

गेल्या पाच दशकांपेक्षा अधिक काळ मुंबई क्रिकेटसाठी आपले आयुष्य वेचणाऱ्या कसोटीपटू दिलीप वेंगसरकर यांना मुंबई क्रिकेट संघटनेने 2022-23 सालचा जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करणार असल्याचे आज जाहीर केले. तसेच महिला कसोटीपटू डायना एडुल्जी यांनाही जीवनगौरव (2023-24) पुरस्कार दिला जाणार आहे. त्याचबरोबर प्रशासक म्हणून मुंबई क्रिकेटसाठी गेली चार दशके झटत असलेल्या प्रा. रत्नाकर शेट्टी, प्रवीण बर्वे यांचाही जीवनगौरव पुरस्काराने गौरव केला जाणार असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष अजिंक्य नाईक यांनी दिली. गुरुवार, 20 मार्चला वांद्रे-कुर्ला संकुलातील शरद पवार क्रिकेट अकादमी येथे हा सोहळा रंगणार आहे.

एमसीएने पद्माकर शिवलकर यांच्या निधनामुळे गेल्या आठवड्यात होणारा आपला हा वार्षिक सोहळा पुढे ढकलला होता. तो आता गुरुवारी होणार असून यात 2022-23 आणि 2023-24 सालासाठी दिग्गजांचा सन्मान केला जाणार आहे. क्रिकेटपटू आणि प्रशासक म्हणून दिल्या जाणाऱ्या जीवनगौरव पुरस्कारासह रणजी विजेत्या मुंबई संघाचा गौरवही केला जाणार आहे. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली मुंबईने गेल्या दोन मोसमात घवघवीत यश संपादले होते.

Comments are closed.