24 दलितांना ठार केल्याबद्दल 3 लोकांना मृत्यूदंड ठोठावले

उत्तरप्रदेशच्या दिहुली येथे 4 दशकांपूर्वी घडला होता गुन्हा : मैनपुरी न्यायालयाने सुनावली शिक्षा

वृत्तसंस्था/ मैनपुरी

4 दशकांपूर्वी उत्तरप्रदेशच्या दिहुली येथे झालेल्या दलितांच्या हत्येप्रकरणी अखेर न्यायालयाने निर्णय दिला आहे. मैनपुरीच्या विशेष न्यायालयाने मंगळवारी कप्तान सिंह, रामपाल आणि राम सेवक यांना दोषी ठरवत मृत्युदंड आणि 50 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

18 नोव्हेंबर 1981 रोजी फिरोजाबाद जिल्ह्याच्या दिहुली गावात 17 सशस्त्र दरोडेखोरांनी अंदाधुंद गोळीबार केला होता. या गोळीबारात 23 जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर उपचारादरम्यान एका इसमाने अखेरचा श्वास घेतला होता. अशाप्रकारे एकूण 24 दलितांची निर्घृण हत्या करण्यात आली होती.

या घटनेप्रकरणी स्थानिक रहिवासी लैइक सिंह यांच्याकडून दाखल तक्रारीवर गुन्हा नोंदविण्यात आला होता. पोलिसांनी चौकशीत 17 दरोडखोरांना आरोपी ठरविले होते, ज्यात टोळीचा म्होरक्या संतोष सिंह (उर्फ संतोसा) आणि राधेशाम (एर्फ राधे) देखील सामील होता. परंतु खटल्यादरम्यान 13 आरोपींचा मृत्यू झाला तर एक आरोपी अद्याप फरार आहे.

4 दशकानंतर न्याय

चार दशकांनी पीडित परिवारांना न्याय मिळाला आहे. हा एक ऐतिहासिक निर्णय आहे, यामुळे समाजात कुठलाही गुन्हेगार कायद्यापासून वाचू शकत नसल्याचा संदेश जाईल असे वक्तव्य शासकीय अधिवक्ते रोहित शुक्ला यांनी केले आहे. तर दोषींना आता या निर्णयाच्या विरोधात उच्च न्यायालयात दाद मागण्याचा अधिकार आहे. तर न्यायालयाच्या या निर्णयाला पीडित परिवारांनी न्यायाचा विजय ठरविले आहे.

पीडितांची इंदिरा गांधींनी घेतली होती भेट

या सामूहिक हत्येनंतर तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी पीडित परिवारांची भेट घेतली होती. तर विरोधी पक्षनेते अटलबिहारी वाजपेयी यांनी दिहुली येथून सादुपूरपर्यंत पदयात्रा काढत पीडित परिवारांबद्दल संवेदना व्यक्त केली होती.

Comments are closed.