जागतिक प्रणालीमध्ये निष्पक्षतेची आवश्यकता: जयशंकर
रायसीना डायलॉगचा दुसरा दिवस : मजबूत अन् निष्पक्ष संयुक्त राष्ट्रसंघाची गरज : पाश्चिमात्य देशांच्या दुटप्पी भूमिकेवर प्रश्नचिन्ह
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
नवी दिल्लीत आयोजित रायसीना डायलॉग 2025 च्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच मंगळवारी विदेशमंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी जागतिक व्यवस्थेत निष्पक्षतेच्या आवश्यकतेवर जोर देत पाश्चिमात्य देशांच्या दुटप्पी भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ‘थ्रोनस अँड थॉर्न्स : डिफेंडिंग द इंटिग्रिटी ऑफ नेशन्स’ सत्रात बोलताना जयशंकर यांनी सार्वभौमत्व आणि क्षेत्रीय अखंडत्वाला जागतिक नियमांचा पाया ठरविले. काश्मीर मुद्द्याचा उल्लेख करत जयशंकर यांनी याला दुसऱ्या महायुद्धानंतर पासून आतापर्यंतचा सर्वात दीर्घ अवैध कब्जा संबोधिले आहे.
काश्मीर प्रश्नी आम्ही संयुक्त राष्ट्रसंघात गेलो, एका आक्रमणाला वाद करण्यात आले. हल्लेखोर आणि पीडिताला एकाच श्रेणीत ठेवण्यात आले. यासाठी जबाबदार घटक कोण होते? ब्रिटन, कॅनडा, बेल्जियम, ऑस्ट्रेलिया, अमेरिका? याचमुळे मला या पूर्ण विषयावर काही प्रश्न उपस्थित करायचे आहेत. पाश्चिमात्य शक्तींनी कशाप्रकारे काश्मीरच्या वास्तविकतेला भटकवून सादर केले हे यातून दिसून येते असे म्हणत जयशंकर यांनी राजनयिक हस्तक्षेपावर पाश्चिमात्य देशांच्या दृष्टीकोनावरही त्यांनी सवाल केला.
जयशंकर यांच्यासोबत चर्चासत्रात लिचेंस्टीनच्या विदेशमंत्री डॉमिनिक हसलर, स्लोवाक रिपब्लिकचे विदेशमंत्री जुराज ब्लानर, स्वीडनचे माजी पंतप्रधान कार्ल बिल्डट देखील सामील झाले. यंदाच्या रायसीना डायलॉगचे उद्घाटन न्युझीलंडच्या पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आले होते.
मजबूत, निष्पक्ष संयुक्त राष्ट्रसंघाची गरज
जर आम्हाला जागतिक व्यवस्थेची गरज असेल तर ती निष्पक्ष असायला हवी. मजबूत संयुक्त राष्ट्रसंघाची गरज आहे, परंतु एका मजबूत संयुक्त राष्ट्रसंघासाठी एक निष्पक्ष संयुक्त राष्ट्रसंघाची गरज आहे. एका मजबूत जागतिक व्यवस्थेत मापदंडांमध्ये काही मूलभूत स्थिरता असायला हवी. आमच्या पूर्व दिशेला म्यानमारमध्ये सैन्य सत्तापालट झाला, असा प्रकार कदापिही घडू नये. मागील 8 दशकांपासून जगाच्या कामकामाचे ऑडिट करणे आणि याविषयी प्रामाणिक असणे तसेच जगात संतुलन अन् सहभागीत्व बदलले असल्याचे समजून घेणे महत्त्वपूर्ण आहे. आम्हाला एका वगेळ्या चर्चेची गरज आहे, आम्हाला एका वेगळ्या व्यवस्थेची गरज असल्याचे उद्गार जयशंकर यांनी काढले आहेत.
महत्त्वाचे चर्चासत्र
रायसीना डायलॉग कुठल्याही विकसनशील देशात व्यापक स्तरावर होणारे एकमात्र चर्चासत्र आहे. रायसीना डायलॉग भारतात कुठल्याही थिंक टँककढून आयोजित केली जाणारी एकमात्र परिषद आहे. ही परिषद सरकारसाठी आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर स्वत:ची भूमिका मांडण्यासाठी एक महत्त्वाचे व्यासपीठ देखील आहे. या परिषदेवर जगभरातील धोरणनिर्माते आणि भूराजकारणात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या लोकांची नजर असते. या परिषदेद्वारे अन्य देश आणि आंतरराष्ट्रीय विषयांच्या तज्ञांना आगामी काळात भारत सरकारच्या प्राथमिकतांबद्दल माहिती मिळत असते. यंदाच्या संमेलनात क्यूबा, स्लोवेनिया, लक्झेंमबर्ग, लिकटेंस्टीन, लाटविया, मोल्दोवा, जॉर्जिया, स्वीडन, स्लोवाक रिपब्लिक, भूपान, मालदीव, नॉर्वे, थायलंड, अँटिग्वा अँड बार्बुडा, पेरू, घाना, हंगेरी आणि मॉरिशसचे विदेशमंत्री भाग घेणार आहेत
Comments are closed.