कचऱ्याचे ढीग, भीषण पाणीटंचाई, ट्रॅफिक जाम; घोडबंदरवासीयांची तिहेरी कोंडी! मूलभूत सोयीसुविधा देण्यास ठाणे महापालिका सपशेल फेल

सोसायट्या व रस्त्यांवर ठिकठिकाणी साचलेले कचऱ्याचे ढीग, तीव्र पाणीटंचाई आणि ट्रॅफिक जाम या तिहेरी कोंडीने घोडबंदरवासीय त्रस्त झाले आहेत. एकीकडे स्मार्ट सिटीचा डंका पिटत असताना दुसरीकडे मूलभूत सोयीसुविधा देण्यासाठी पालिका सपशेल फेल ठरली असल्याचा आरोप स्थानिकांनी केला. दरम्यान महागडी घरे खरेदी करणाऱ्या घोडबंदरमधील नागरिकांवर होणारा अन्याय पालिकेला दिसणार कधी? असा सवाल नागरिकांनी केला आहे.
घोडबंदर रोडवरील सोसायट्या व आस्थापनांच्या माध्यमातून महापालिकेला सर्वाधिक मालमत्ता कर उपलब्ध होतो, तर बिल्डरांकडून दाखल केल्या जाणाऱ्या विकास प्रस्तावांवर आकारल्या जाणाऱ्या शुल्कामुळे महापालिकेची तिजोरी मोठ्या प्रमाणावर भरली जाते. मात्र महापालिकेला महसूल देणाऱ्या घोडबंदरवासीय प्रामाणिक करदात्यांवर सातत्याने अन्याय होत आहे. सद्यस्थितीत घोडबंदर रोडवरील नागरिकांना ठिकठिकाणी साचलेला कचरा, तीव्र पाणीटंचाई आणि वाहतूककोंडीच्या प्रश्नाला सामोरे जावे लागत आहे. या तिहेरी कोंडीमुळे नागरिकांचा श्वास कोंडला असल्याने या भागातील रहिवासी शिष्टमंडळाने आज पालिका आयुक्त सौरभराव यांची आज भेट घेत निवेदन दिले.
आश्वासने देऊन कागदी घोडे नाचविले
गेल्या काही वर्षांपासून या भागात तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. आतापर्यंत पालकमंत्री, खासदार, आमदार, महापौर आदींच्या उपस्थितीत अनेक बैठका झाल्या. दरवेळी गोड बोलून आश्वासने देऊन कागदी घोडे नाचविले जातात. एका बैठकीत ५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा वाढवून देण्याचे आश्वासन दिले गेले होते. प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी न करता घोडबंदरवासीयांच्या तोंडाला पाने पुसण्यात आली असल्याचा आरोप नागरिकांनी केला.
Comments are closed.