लाडक्या बहिणींचे पैसे वळविले कर्ज खात्यात, अजित नागरी पतसंस्थेच्या विरोधात ठिय्या आंदोलन; न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेनेचा पुढाकार

लाडक्या बहिणीच्या नावावर आलेले पैसे अजित नागरी सहकारी पतसंस्थेने कर्ज खात्यात वळती करून घेतल्यामुळे संतप्त महिलांनी सहकार आयुक्तालयासमोर ठिय्या आंदोलन केले. शिवसेनेने पुढाकार घेऊन लाडक्या बहिणींना न्याय देण्यासाठी सहकार आयुक्तांपर्यंत धडक मारली.
गेल्या काही महिन्यांपासून अजित नागरी सहकारी पतसंस्थेच्या सुमारे 1050 कर्जदार खातेदार आहेत. बचत गटाच्या माध्यमातून त्यांनी 57 लाख रुपये कर्ज काढले. त्याच्या तुलनेत 97 लाख रुपयांची परतफेड त्यांनी केली आहे. मात्र, या कर्ज भरल्याच्या सुमारे 250 पावत्या या खोटे असल्याचे आणि एजंट आणि या महिलांची फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले आहे. यासंदर्भात या महिलांनी दोन महिन्यांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन केले होते, त्याची दखल घेऊन चौकशी सुरू केली होती. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे शहरप्रमुख संजय मोरे यांनी या आंदोलकांसाठी पुढाकार घेतला होता.
दोन महिन्यानंतरही न्याय न मिळाल्याने आज या महिला जिल्हा सहकार उपनिबंधक कार्यालयापुढे आल्या; परंतु या कार्यालयातील उपनिबंधकांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्यामुळे त्यांनी आपला धडक मोर्चा सहकार आयुक्तांकडे वळवला. यावेळी शिवसेना संघटक वसंत मोरे आणि शहरप्रमुख संजय मोरे यांनी या आंदोलक महिलांसह सहकार आयुक्तालय सेंटर बिल्डिंगपुढे आंदोलन केले. लाडकी बहीण योजनेचे शासनाकडून येणारे पैसे या पतसंस्थेने परस्पर कर्ज खात्यामध्ये वळती करून घेतले. त्यामुळे या महिलांना प्रत्यक्ष योजनेचा लाभ मिळाला नाही. याबद्दल संताप व्यक्त केला.
आंदोलक आणि वसंत मोरे, संजय मोरे यांनी चर्चा केली. त्यानंतर दोन दिवसांमध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे आणि त्यांची खाती खुली केली जातील, असे आश्वासन आयुक्त तावरे यांनी दिले. या पतसंस्थेमध्ये झालेला प्रकार आणि एजंट यांनी केलेल्या फसवणुकीसंदर्भात चौकशी करून कारवाईचे आश्वासन त्यांनी दिले.
Comments are closed.