खोल खोल पाणी ,विहिरी तळाशी; जिल्ह्यात पाणीबाणी

उन्हाचा कडाका सातत्याने वाढू लागल्याने पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात काही ठिकाणी विहिरींनी तळ गाठला असून, बोअरवेलमध्ये खडखडाट झाला आहे. काही भागांत पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण झाल्याने शेतातील उभी पिके, फळबाग जगवायची कशी? असा यक्षप्रश्न काही शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे. पाण्याची कमतरता असल्याने अंजीर, पेरू, डाळिंबसारख्या फळबागा जगवण्यासाठी मार्च महिन्यातच टँकरचे पाणी विकत घेण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा कडाका दिवसेंदिवस वाढत आहे. मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातच कमाल तापमानाच्या पाऱ्याने चाळीशी ओलांडली आहे. पुणे जिल्ह्यातील काही ग्रामीण भागात कमाल तापमान चाळीस अंशांच्या आसपास स्थिरावले आहे. उन्हाच्या तीव्रतेमुळे जिल्ह्यातील काही ठिकाणी विहिरींनी तळ गाठला आहे. तर, दिवसातून पाच ते सहा तास चालणारे बोअर दोन ते तीन तासच सुरू राहत आहे. पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात प्रामुख्याने शेतकरी फळबागा लावण्यास पसंती देत आहेत. त्यामुळे अंजीर, पेरू, डाळिंबाचे उत्पन्न घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होऊ लागली आहे. मात्र, पाण्याची कमतरता भासत असल्याने फळबागा जगवण्यासाठी शेतकऱ्यांना टँकरचा आधार घ्यावा लागत असून, त्यांच्या खिशाला कात्री लागत आहे.
संजीवानी
उन्हाळ्याच्या दिवसांत पाणी ही प्रमुख समस्या शेतकऱ्यांपुढे असते. विहिरी आणि बोअरने तळ गाठल्यानंतर पाणी आणायचे कोठून? असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे असतो. या समस्येवर मात करण्यासाठी काही शेतकऱ्यांनी शेतामध्ये शेततळे घेतले असून, त्यातील पाणी उन्हाळ्यात शेतकऱ्यांसाठी संजीवनी ठरत आहे.
विहिरी आणि बोअरचे पाणी कमी झाले आहे. त्यामुळे पाण्याचा मोठा प्रश्न मार्च महिन्यातच निर्माण झाला आहे. यंदा दसरा, नवरात्राच्या काळात पाहिजे तसा मोठा पाऊस झाला नाही. त्यामुळे काही भागातील विहिरी, बोअरचे पाणी लवकर कमी झाले आहे. विहिरीतील पाण्याने तळ गाठल्याने पिण्याच्या पाण्याबरोबरच शेतीसाठी पाणी कसे पुरवायचे हा प्रश्न
शेतकऱ्यांपुढे आहे.
– गेनबा शिंदे, शेतकरी, पुरंदर.
Comments are closed.