विरोधकांना बोलू दिले जाणार नसेल, तर सभात्याग करू; विश्वासदर्शक ठरावावर अंबादास दानवे यांचा इशारा

राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधकांनी विधानपरिषद उपसभापतीविरोधात अविश्वासाचा प्रस्ताव दिला होता. मात्र, सरकारने अचनाक उपसभापतींबाबत विश्वासदर्शक ठराव मांडत तो मंजूर करून घेतला. त्याला कायद्याचा आधार काय? असा संतप्त सवाल विधनपरिषेदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. या मुद्द्यावरून बुधवारी सभागृहात वातावरण चांगलेच तापले होते.

सत्ताधाऱ्यांकडे बहुमत आहे. त्याच्या जोरावर ते प्रस्ताव मांडू शकतात आणि पारितही करून घेऊ शकतात. मात्र, याबाबत विरोधी पक्षांचे म्हणणे काय आहे. आम्ही अविश्वास प्रस्ताव का मांडत होतो, ती आमची बाजू मांडण्याची संधी आम्हाला मिळायला हवी, असे अंबादास दानवे यांनी म्हटले आहे. आम्ही प्रस्ताव सादर केल्यानंतर 15 दिवसांची मुदत होती. मात्र, सरकारने अचानक विश्वासदर्शक ठराव मांडत तो कोणत्या कायद्याच्या आधारे मंजूर करून घेतला, असा सवालही दानवे यांनी केला आहे.

बहुमत असल्याने सत्ताधाऱ्यांचा प्रस्ताव मंजूर होणार यात काही वाद नाही. मात्र, विरोधकांना त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी हवी. सभागृहात विरोधी पक्षांचे सदस्य यावर आवाज उठवत होते. मात्र, त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले, याबाबतही त्यांनी संतपा व्यक्त केला. सभापती हे कोणत्याही पक्षाचे नसतात. मात्र, सभापती एखाद्या पक्षाच्या पदाधिकऱ्यांप्रमाणे काम करत आहेत. सर्व सदस्यांना न्याय देणारी त्यांची भूमिका असायला हवी. कोणतीही चर्चा न करता असा प्रस्ताव आणलाय कसा, यामध्ये अधिकारही दोषी आहेत, हे कामकाजात होते का, हे नियमात बसते का, याचे उत्तरही त्यांना द्यावे लागेल, असे दानवे यांनी ठणकावले.

विश्वासदर्शक ठराव मांडायचा असेल तर मांडा. त्याल विरोध नाही. मात्र, ते कार्यक्रमपत्रिकेत येऊ द्या. त्यावर चर्चा होत नाही, असे सभागृहात चालणार नाही. अशाप्रकारे सभागृहाचा, विरोधी पक्षांचा आणि सदस्यांचा सातत्याने अवमान होत आहे. सरकारला मस्ती आणि मुजोरी आली असून पाशवी बहुमताचा ते गैरवापर करत आहेत. सभागृहात प्रश्नही त्यांचे, लक्षवेधीही त्यांच्याच आणि मंत्री उत्तरेही देणार त्यांच्याच प्रश्नांना, विरोधी पक्षांना बोलण्याची संधीच मिळत नाही. हा नेमका काय प्रकार आहे. सर्वाधिक लक्षवेधी सत्ताधारी पक्षाच्या आहेत. त्यामुळे एकांगी पद्धतीने सभागृहाचे कामकाज चालवण्याचा सभापती आणि तालिका सभापती यांच्याकडून प्रयत्न होत आहे, असा आरोपही त्यांनी केला.

आम्ही मांडलेल्या प्रस्तावाचे काय झाले, प्रवीण दरेकर यांनी कोणत्या नियमाच्या आधारे ठराव मांडला, याचे समाधानकराक उत्तर द्यावे, तसेच सभागृहात विरोधकांना बोलू दिले जाणार नसेल, तर आम्ही सभात्याग करू, तसेच आम्ही कोणत्याही कामकाजात सहभागी होणार नाही, असा इशाराही दानवे यांनी दिला.

Comments are closed.