Sindhudurg News – नागपूर हिंसाचारावेळी गृहखाते झोपले होते का? परशुराम उपरकर यांचा सवाल

औरंगजेबाची कबर हटवण्यावरून नागपुरात दंगल उसळली. आरएसएच्या बालेकिल्ल्यात ही दंगल झाली. राज्यात कुठेही हिंदू-मुस्लिमांमध्ये वाद निर्माण झाल्यानंतर स्वतःला हिंदूंचे गब्बर म्हणून घेणारे मंत्री नितेश राणे हे त्याठिकाणी आवर्जून भेट देतात. मात्र, नागपुरात दंगल उसळल्यानंतर त्याठिकाणी मंत्री राणे का गेले नाहीत? नागपुरात घडलेली हिंसाचाराची घटना हा सुनियोजित पॅटर्न होता, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. हिंसाचार हा पूर्वनियोजित पॅटर्न असेल तर गृहमंत्र्यांचे खाते झोपले होते का? असा सवाल शिवसेन (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नेते तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केला.

कणकवली येथील संपर्क कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत उपरकर बोलत होते. नागपुरामध्ये दंगल उसळल्यानंतर मंत्री नितेश राणे यांनी त्याठिकाणी का जाणे टाळले? असा प्रश्न हिंदूंना पडला आहे. नागपुरातील दंगल ही पूर्वनियोजित कट होता आणि हा कट घडवून आणण्यासाठी ट्रकभर दगड आणले होते, असे मंत्री नितेश राणे यांचे म्हणणे आहे. यावरून राज्याचे गृहखाते सपशेल फेल असल्याचे सिद्ध झाले आहे, अशी टीका उपरकर यांनी केली.

नितेश राणे हे आपण हिंदूंचे गब्बर असल्याचे वागून मुस्लीम धर्माला टार्गेट करून त्यांच्याविरोधात वादग्रस्ते विधाने करतात. त्यांची ही विधाने दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण करणारी आहेत. त्यामुळे राज्यातील सामाजिक सलोखा बिघडण्याची भीती असल्याने भाजपने त्यांना वेळीच रोखणे गरजेचे आहे, अन्यथा नागपुरसारख्या हिंसाचाराच्या घटना राज्यात ठिकठिकाणी घडतील. नितेश राणे यांना कोणीतरी स्क्रीप्ट देत असून या स्क्रीप्टनुसार ते वादग्रस्ते विधाने करीत आहेत. मात्र, हिंदू-मुस्लिमांमध्ये तेढ निर्माण होऊ नये अशी महाराष्ट्रवासीयांची अपेक्षा आहे. त्यामुळे नितेश राणेंनी दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण होतील, अशी विधाने करू नये, असा सल्ला उपरकर यांनी दिला.

काँग्रेस पक्षात असताना नितेश राणे यांची आरएसएस व भाजपबद्दल काय भूमिका होती, आता भाजपमध्ये आल्यानंतर राणे हे मुस्लिमांबद्दल ते कडवट भूमिका घेताना दिसत आहेत. त्यावरून स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी ते नेहमीच आपली भूमिका बदलतात, हे सिद्ध झाले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्य निर्माणाच्या कार्यात मुस्लिम नव्हते, असे नितेश राणे यांनी विधान केले. त्यांचे हे विधान त्याच्या पक्षाचे खासदार असलेले उदयराजे भोसले यांनी खोडून काढले आहे. त्यामुळे शिवरायांचा खरा इतिहास त्यांनी वाचला पाहिजे, असा टोला उपरकर यांनी लगावला. नागपुरातील दंगल ही पुर्वनियोजित कट होता, असे नितेश राणे यांनी सांगून त्यांनी एकप्रकारे महायुती सरकार व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अविश्वास दाखवला आहे, असे उपरकर म्हणाले.

Comments are closed.