मेहुल चोकसी अँटिगाकडूनही फरार
कॅरेबियन देशाच्या विदेशमंत्र्यांनी दिली माहिती
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
मेहुल चोक्सी आता अँटिग्वामध्ये देखील नाही. मेहुल चोक्सी उपचारासाठी अन्य ठिकाणी गेला आहे. त्याच्या प्रकरणी कायदेशीर प्रक्रियेचे पालन केले जाणार असल्याचे अँटिग्वा-बार्बुडाचे विदेशमंत्री चेट ग्रीन यांनी म्हटले आहे.
चोक्सी प्रकरणी कुठलीच धूळफेक केली जाणार नाही. आमच्या देशाचा नागरिकत्व गुंतवणूक कार्यक्रम विश्वासार्ह असून यात अनेक स्तरांवर पडताळणी केली जात असल्याचे ग्रीन यांनी नमूद केले आहे.
नागरिकत्व कार्यक्रम प्रकरणी एक-दोनवेळा प्रश्न उपस्थित झाले आहेत, परंतु चोक्सी प्रकरणी सर्व नियमांचे पालन करण्यात आले होते. चोक्सीला नागरिकत्व देण्यापूर्वी करण्यात आलेल्या चौकशीत तो भारत किंवा अन्य कुठल्याही देशाच्या कायद्याचे उल्लंघन करत नव्हता असे दिसून आले होते. नंतर स्थिती बदलणे ही आमच्या प्रक्रियांमधील त्रुटी नाही. अँटिग्वा सरकार मित्रदेशांसोबत काम करणे जारी ठेवणार आहे. अँटिग्वाने अनेक आंतरराष्ट्रीय करारांवर स्वाक्षरी करत अन्य देशांच्या सार्वभौमत्वाचा आदर केला आहे. ज्याप्रकारे आम्ही इतरांकडून आमच्या सार्वभौमत्वाच्या आदराची अपेक्षा करतो, त्याचप्रकारे आम्ही अन्य देशांच्या सार्वभौमत्वाचा आदर करतो, असे ग्रीन यांनी म्हटले आहे.
Comments are closed.