नोकरी प्रकरणात जमीन मध्ये लालू प्रसादने चौकशी केली

पाटण्यातील ईडीच्या कार्यालयात लावली हजेरी

वृत्तसंस्था/ .पाटणा

लँड फॉर जॉब घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव हे बुधवारी ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहिले. यादरम्यान ईडीच्या अधिकाऱ्यांनी लालूप्रसाद यांना अनेक प्रश्न विचारले. रेल्वेत नोकरी देण्याच्या बदल्यात उमेदवारांकडून जमिनी मिळविल्याचा आरोप लालूप्रसाद आणि त्यांच्या कुटुंबीयांवर आहे. ईडीने मंगळवारी बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी आणि त्यांचे पुत्र तेजप्रताप यांची चौकशी केली होती. दोघांनाही वेगवेगळ्या कक्षात बसून ईडीच्या अधिकाऱ्यांनी प्रश्न विचारले होते.

ईडीने विचारलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे देणे राबडी देवींनी टाळले आहे. याप्रकरणी काही अतिरिक्त तपशील समोर आल्याने नव्याने चौकशी करणे आवश्यक ठरले होते असे ईडीचे सांगणे आहे. राबडीदेवी, तेजप्रताप आणि लालूप्रसाद यांचे जबाब पीएमएलए अंतर्गत नोंदवून घेतले जात आहेत.

दिल्लीत न्यू फ्रेंड्स कॉलनीतील बंगला कसा मिळविला? पाटण्यातील सगुना येथील अपार्टमेंटसाठी जमीन कशाप्रकारे खरेदी केली? या संपत्तींच्या खरेदीसाठी पैसे कुठून आले यासह अनेक प्रश्न ईडीने राबडीदेवींना विचारले होते. या प्रश्नांना उत्तरे देणे राबडीदेवींनी टाळले आहे.

सर्व यंत्रणा या भाजपच्या बी टीम आहेत. या यंत्रणांचे सर्व कामकाज आता बिहारमध्ये दिसून येईल. परंतु आम्हाला यामुळे कुठलाच फरक पडत नाही. आम्ही कायद्याचे पालन करू. चौकशीसाठी बोलाविले असेल तर आम्ही जाऊ, परंतु यातून काहीच साध्य होणार नाही. भाजप घाबरला असल्यानेच हे प्रकार घडत आहेत. बिहारमध्ये आम्हीच सरकार स्थापन करू असे राजद नेते तेजस्वी यादव यांनी म्हटले आहे.

ईडीने मागील वर्षी दिल्लीच्या एका न्यायालयात लालूप्रसाद यांच्या परिवाराच्या सदस्यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल केले होते. यात राबडी देवी आणि त्यांच्या कन्या मीसा भारती तसेच हेमा यादव यांनाही आरोपी करण्यात आले आहे. लालूप्रसाद यांनी संपुआ-1 सरकारमध्ये रेल्वेमंत्री असताना रेल्वेतील भरती प्रक्रियेत घोटाळा केल्याचा आरोप आहे.

Comments are closed.