2040 पर्यंत भारतीय अंतराळवीर चंद्रावर पोहोचण्यासाठी

नवी दिल्ली :

लोकसभेत बुधवारी प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान एका प्रश्नाच्या उत्तरादाखल पीएमओचे राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी अंतराळ संशोधनाशी संबंधित माहिती दिली आहे. योगायोगाने आजच (बुधवार) सुनीता विल्यम्स या अंतराळातून सुखरुप परतल्या आहेत. हा गर्व, गौरव आणि दिलासादायक क्षण असल्याचे उद्गार सिंह यांनी काढले आहेत. अंतराळात देशाचे एक स्थानक असावे आणि त्याचे नाव भारत असावे, अशी सरकारची योजना आहे. तर 2040 पर्यंत चंद्रावर माणूस पाठविण्याची योजना असल्याचे जितेंद्र सिंह यांनी सांगितले आहे. पुढील वर्षी गगनयान मोहीम प्रक्षेपित केली जाणार आहे. याकरता अंतिम परीक्षण चालू वर्षी होणार असून त्याला व्यो मित्र नाव देण्यात आले आहे. या परीक्षणात रोबोचा वापर केला जाईल, जो सर्व प्रक्रियांना सामोरा जाणार असल्याचे सिंह यांनी सांगितले आहे. चांद्रयान मिशनच्या यशाच्या अनुभवाचा वापर अन्य मोहिमांकरताही केला जाणार आहे. चांद्रयान-4 ही मिशन मूळ स्वरुपात नमुने मिळविण्यासाठी आहे, परंतु हे डॉकिंग आणि अनडॉकिंग समवेत प्रत्येक प्रक्रियेचे पालन करणार आहे, आम्ही कुठल्याही देशाच्या तुलनेत पिछाडीवर नाही, चंद्राच्या दक्षिण ध्रूवाला स्पर्श करणारा भारत हा पहिला देश ठरला असल्याचे उद्गार केंद्रीय मंत्र्यांनी काढले आहेत.

Comments are closed.