तपास पूर्ण होऊनही आरोपी केले, पायल तडवी आत्महत्या प्रकरण; नायर रुग्णालयाच्या माजी विभागप्रमुखाची हायकोर्टात धाव

पायल तडवी आत्महत्याप्रकरणी आरोपी करण्यात आलेल्या नायर रुग्णालयातील स्त्रीरोग आणि प्रसूती विभागाच्या माजी विभागप्रमुख डॉ. चिंग लिंग यी यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. तपास पूर्ण होऊनही त्यांना विशेष सत्र न्यायालयाने आरोपी करण्याचे आदेश दिल्याने डॉ. चिंग यांनी याविरोधात हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे.

पायल तडवी आत्महत्याप्रकरणी आग्रीपाडा पोलीस ठाण्यात संबंधित डॉक्टरांविरोधात 23 मे 2019 रोजी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला आहे. असे असतानाही डॉ. चिंग यांना चौथे आरोपी करण्याचे आदेश विशेष सत्र न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे सत्र न्यायालयाच्या या निकालाला डॉ. चिंग यांनी अॅड. आशीष चव्हाण यांच्यामार्फत आव्हान दिले आहे. विशेष न्यायालयाने जुलै 2019 मध्ये या गुह्याची दखल घेतली आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये आरोप निश्चित करण्यासाठी युक्तिवाद सुरू असतानाच फिर्यादीने डॉ. चिंग यांना चौथा आरोपी म्हणून एफआयआरमध्ये नोंद करण्याची मागणी केली, मात्र फिर्यादीने हा विलंबाने केलेला प्रयत्न असून डॉ चिंग यांच्या विरोधात कोणताही पुरावा नसल्याचे याचिकेत म्हटले आहे. पुराव्याशिवाय कोर्टाने केवळ आरोपपत्रावर विसंबून राहणे अन्यायकारक आहे. त्यामुळे हायकोर्टाने अंतरिम दिलासा म्हणून, डॉक्टरांना अतिरिक्त आरोपी म्हणून स्थगिती द्यावी तसेच सत्र न्यायालयातील डॉ. चिंग यांची हजेरी माफ करावी अशी मागणी करण्यात आली आहे.

Comments are closed.