मातृभाषेतून शिक्षण खूप उपयुक्त आहे

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून स्पष्ट प्रतिपादन

वृत्तसंस्था/ बेंगळूर

सध्या देशात भाषेच्या नावावर होत असलेला विवाद चिंताजनक आहे. शिक्षणासाठी मातृभाषेचा उपयोग करणे हा या वादावरचा सर्वोत्तम तोडगा ठरेल, अशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका आहे, असे प्रतिपादन या संघटनेचे संयुक्त महासचिव सी. आर. मुकुंद यांनी केले आहे. सध्या बेंगळूर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रतिनिधी सभेची बैठक होत आहे. या बैठकीच्या निमित्ताने मुकुंद यांनी भाषा विवादावर संघटनेची भूमिका शुक्रवारी पत्रकारांसमोर स्पष्ट केली आहे.

देशाच्या एकात्मतेला आव्हान देणाऱ्या शक्ती हा देशासमोरचा सर्वाधिक चिंतेचा विषय आहे. भारताची विभागणी उत्तर-दक्षिण अशी करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. हे घातक प्रयत्न आहेत. मणिपूरमधील परिस्थितीसंबंधीही संघाला चिंताजनक वाटते. संघाच्या या प्रतिनिधी बैठकीत आम्ही या विषयांवरही चर्चा करणार आहोत, असे या पत्रकार परिषदेत मुकुंद यांनी स्पष्ट केले.

भाषाविवादावर प्रस्ताव नाही

या बैठकीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भाषा विवादावर कोणताही प्रस्ताव संमत करणार नाही. मात्र, या विषयावर केवळ चर्चा केली जाऊ शकते. मातृभाषा हेच शिक्षणाचे सर्वोत्तम माध्यम असून व्यवहारही याच भाषेत व्हावेत, अशी संघाची भूमिका आहे. त्यामुळे मातृभाषेतून शिक्षणाला प्राधान्य दिले जावे, ही संघाची मागणी असल्याचे प्रतिपादन त्यांनी या पत्रकार परिषदेत केले.

बैठकीसंबंधी माहिती

बेंगळूर येथे होत असलेल्या बैठकीत कोणते विषय हाताळले जातील, याविषयीची माहिती त्यांनी पत्रकारांना दिली. या बैठकीत राष्ट्रीय मुद्द्यांवर चर्चा केली जाईल. तसेच संघटना आणि तिची प्रगती यांच्याविषयीही आढावा घेतला जाणार आहे. संघाचा आणखी विस्तार करणे आणि शाखांची संख्या वाढविणे यावरही भर दिला जाण्याची शक्यता असल्याचे प्रतिपादन मुकुंद यांनी केले.

परिसीमन कार्यकक्षेत नाही

लोकसभा मतदारसंघांच्या परिसीमनाचा विषय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकक्षेत येत नाही. त्यामुळे त्यासंबंधाने संघटना आपला कोणताही विचार किंवा धोरण व्यक्त करणार नाही. देशाच्या एकात्मतेविषयी आम्ही चर्चा करणार आहोत. मध्यंतरीच्या काळात एका राज्याच्या अर्थसंकल्पात रुपयाचे राष्ट्रीय चिन्ह परिवर्तित करण्याचा प्रकार झाला. संघाच्या अशा प्रयत्नांना विरोध आहे. उत्तर आणि दक्षिण अशा विवादाला काही जणांकडून खतपाणी घातले जात आहे. त्याविषयी आम्ही सतर्क आहोत. असे प्रयत्न केले जाऊ नयेत. त्यांच्यामुळे कोणाचेही भले होणार नाही, अशी आमची भूमिका आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.

मणिपूरचा प्रश्न जटील

मणिपूरमध्ये मैतेयी आणि कुकी तसेच अन्य काही जमातींमध्ये मोठी दरी निर्माण झाली आहे. ती लवकरात लवकर मुजविण्याची आवश्यकता आहे. मात्र, तेथील संघर्षाने काही प्रश्न जटील झाले असून दोन्ही मुख्य जमातींमधील अविश्वासाचे वातावरण दूर करण्यासाठी बराच कालावधी लागेल असे आमचे मत आहे. त्यामुळे या विषयावर चर्चा केली जाणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

Comments are closed.