मुंबईत होतेय गुजरातमधील गुटख्याची खुलेआम विक्री, विरोधकांनी सरकारला धारेवर धरले

प्रातिनिधिक फोटो

मुंबईत गुटख्याच्या विक्रीवर बंदी आहे. पण तरीही शेजारच्या राज्यातून मुंबईत राजरोसपणे गुटखा येतो आणि पोलिसांच्या समोर केवळ गुटखा नव्हे, तर ड्रग्जचीही विक्री होते. या विव्रेत्यांना पोलीस पाठीशी घालतात. गुटखा आणि ड्रग्जमुळे संपूर्ण पिढी बरबाद होत आहे, अशा शब्दात विरोधी पक्षाच्या सदस्यांनी आज सरकारला विधानसभेत धारेवर धरले. ड्रग्ज विव्रेत्यांच्या विरोधात मोक्काअंतर्गत कारवाई करण्याची मागणी काँग्रेस सदस्यांनी केली.

चांदिवलीतील बेकायदा गुटखा, गांजा, चरसची विक्री तसेच ऑनलाईन लॉटरीच्या संदर्भात आमदार दिलीप लांडे यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. या भागात शेजारच्या राज्यातून गुटखा येतो. पहाटेच्या वेळेस ट्रकमधून गुटखा येतो. आसपासच्या गोदामांमध्ये गुटखा ठेवतात. संजय नगर भागातील पोलीस बीटच्या दहा मीटर अंतरावर गुटख्याची विक्री होते. हिरानंदानी कॉलेज, पोदार कॉलेज अशा कॉलेजच्या बाजूला बिडी शॉपमध्ये विक्री होते. पालिका व पोलीस काही कारवाई करीत नाहीत, असे दिलीप लांडे म्हणाले.

गुटख्याच्या सेवनाचे दुष्परिणाम

काँग्रेसचे सदस्य विजय वडेट्टीवार हे गुटखा विक्रीवरून प्रचंड आक्रमक झाले. गुजरातमधून गुटखा येतो. पोलिसांनी मनात आणले तर गुटख्याची एक पुडीही विकली जाणार नाही. गुटख्याच्या दुष्परिणामाकडे त्यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. विदर्भ, मराठावाडय़ात गुटख्याच्या सेवनामुळे अनेकजण मृत्युमुखी पडतात. गुटख्याच्या विक्रीला आळा घालता येत नसेल तर गुटखाबंदी उठवा, अशा शब्दात संताप व्यक्त केला.

ड्रग्ज विव्रेत्यांवर मकोका लावा

यावेळी चर्चेत भाग घेताना काँग्रेसचे सदस्य अस्लम शेख यांनी मुंबईतली ड्रग्जच्या विक्रीकडे सभागृहाचे लक्ष वेधले. रेल्वे स्टेशनचा परिसर, मैदाने अशा ठिकाणी ड्रग्जची विक्री होते. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थाही धोक्यात येते. वारंवार गोमांसची विक्री करणाऱयांवर मकोकाअंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे. त्याच धर्तीवर ड्रग्जची विक्री करणाऱयांच्या विरोधात मकोकाअंतर्गत कारवाई करण्याची मागणी केली. त्याशिवाय अमली पदार्थाच्या व्यसनातून बाहेर काढण्यासाठी पुनर्वसन केंद्र स्थापन करण्याची सूचनाही अस्लम शेख यांनी केली. या चर्चेला उत्तर देताना गृहराज्यमंत्री योगेश कदम म्हणाले की, गुटखा व ड्रग्ज विव्रेत्यांवर कारवाई करण्यात येईल. नशेच्या आहारी गेलेल्यांसाठी पुनर्वसन केंद्राची गरज त्यांनी व्यक्त केली.

Comments are closed.