Sanjay Raut’s taunt to Eknath Shinde


मुख्यमंत्री फडणवीस यांनी सरकारतर्फे मंत्री गिरीश महाजन यांना जम्मू काश्मीरमध्ये पाठवले असल्याने तिथे अन्य कोणी जाण्याची गरज नाही. या दु:खद प्रसंगी महायुती सरकारमधील घटक पक्ष कुरघोडी आणि श्रेयवादाच्या लढाईमध्ये महाराष्ट्राचे हसं करत आहेत.

(Pahalgam Terror Attack) मुंबई : दक्षिण काश्मिरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाममध्ये बैसरन खोऱ्यात मंगळवारी दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात आतापर्यंत 26 पर्यटकांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या मृतांमध्ये या महाराष्ट्रातील सहा पर्यटकांचा समावेश आहे. या हल्ल्यावरून संतापाबरोबरच मृतांबद्दल दु:खही व्यक्त केले जात आहे. आता महाराष्ट्रातील इतर पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी आणि त्यांना राज्यात सुखरुप परत आणण्यासाठी राज्य सरकारकडून सुरुवात करण्यात आली आहे. तिथे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन हे बुधवारी श्रीनगरला दाखल झाले. त्यापाठोपाठ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेही तिथे पोहोचले. त्यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे यांच्यावर टीका केली आहे. (Sanjay Raut’s taunt to मराठी)

पहलगाममधील हादरवणारी घटना समोर आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मंगळवारी रात्री उशिरापर्यंत आणि बुधवारी दिवसभर सर्व मदतकार्यावर लक्ष ठेवून होते. या हल्ल्यात डोंबिवलीचे अतुल मोने, हेमंत जोशी, संजय लेले या तिघांचा तसेच पनवेलच्या दिलीप देसले यांचा जागीच मृत्यू झाला होता. तर गंभीर जखमी झालेले पुण्याचे संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला.

हेही वाचा – Pahalgam Terror Attack : संकटकाळी सरकारच्या पाठीशी, सर्वपक्षीय बैठकीसंदर्भात ठाकरे गटाची स्पष्ट भूमिका

त्यानंतर उर्वरित पर्यटकांना महाराष्ट्रात परत आणण्याची व्यवस्था राज्य सरकारकडून करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील पर्यटकांना श्रीनगरहून मुंबईत परत आणण्यासाठी एका विशेष विमानाची व्यवस्था करण्यात आली. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी यासाठी पूर्ण सहकार्य करत असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. तसेच, महाराष्ट्रातील पर्यटकांना मदत करण्यासाठी फडणवीस यांनी मंत्री गिरीश महाजन यांना श्रीनगरला पाठविले आहे. त्यापाठोपाठ एकनाथ शिंदे खासगी विमानाने जम्मू काश्मीरला रवाना झाले.

याबद्दल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना विचारले असता ते म्हणाले, सरकार म्हणून एकत्र काम करण्याची गरज आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सरकारतर्फे मंत्री गिरीश महाजन यांना जम्मू काश्मीरमध्ये पाठवले असल्याने तिथे अन्य कोणी जाण्याची गरज नाही. या दु:खद प्रसंगी महायुती सरकारमधील घटक पक्ष कुरघोडी आणि श्रेयवादाच्या लढाईमध्ये महाराष्ट्राचे हसं करत असल्याची टीका त्यांनी केली.

काश्मीरमधील या घटनेबाबत आम्ही विरोधक आणि केंद्र सरकार एक आहोत असे सांगत आहोत. तर महाराष्ट्रातील सरकारमधील वाद ते दाखवत आहेत. एकनाथ शिंदे समांतर सरकार चालवतायत का? की, एकनाथ शिंदे फडणवीस यांचे ऐकायला तयार नाहीत? असा खोचक सवाल करून खासदार संजय राऊत म्हणाले, खरंतर, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी यात हस्तक्षप करायला पाहिजे. कारण ते शिंदे यांच्या शिवसेनेचे प्रमुख आहेत, अशी कोपरखळीही त्यांनी दिली.

हेही वाचा – Pahalgam Terror Attack : बायका – मुलांना आम्ही कधीच… हल्ल्यानंतर काय म्हणाले दहशतवादी



Source link

Comments are closed.