कल्याण, डोंबिवलीतील शेकडो पर्यटकांनी केले बुकिंग रद्द; कश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यानंतर पर्यटक धास्तावले

कश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या गोळीबारामध्ये 26 पर्यटकांचा मृत्यू झाला. यामध्ये डोंबिवलीतील तिघा पर्यटकांनाही हकनाक जीव गमवावा लागला. दहशतवादी हल्ल्याच्या पाश्र्वभूमीवर जम्मू-कश्मीरमध्ये फिरण्यासाठी जाणाऱ्या पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. जे कश्मीरमध्ये आहेत ते तेथून काढता पाय घेतायत, तर ज्यांना जायचं होतं त्यांनी पर्यटनाच्या प्लानला फुल्ली मारली आहे. गेल्या चार दिवसांत कल्याण, डोंबिवलीतील 600 ते 700 जणांनी बुकिंग रद्द करून जम्मू-कश्मीरला जाणे टाळले आहे. परिणामी शहरातील विविध ट्रॅव्हल एजन्सीच्या कार्यालयांत शुकशुकाट पाहायला मिळत आहे.

मार्चमध्ये मुलांच्या परीक्षा झाल्या की अनेक जण पर्यटनाचा बेत आखतात. मात्र कश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू-कश्मीरला जाण्याची रिस्क कुणी घ्यायला तयार नाही. कश्मीरच्या आजूबाजूला असलेले लडाख, गुलमर्ग आदी भागात जाण्यासाठी केलेल्या बुकिंगदेखील भीतीपोटी रद्द करण्यात आल्या आहेत. याबाबत कल्याणमधील देशपांडे ट्रॅव्हल्सचे प्रथमेश देशपांडे यांनी सांगितले की 370 कलम हटवल्यानंतर कश्मीर व आजूबाजूच्या परिसरात जाण्यासाठी पर्यटक वाढले होते. दरवर्षी उन्हाळी सुट्ट्यांमध्ये 600 ते 700 बुकिंग होत असे. मात्र दहशतवाद्यांनी हल्ला केल्याची घटना घडली आणि त्यानंतर नागरिक घाबरले आहेत.

दिवसभर फोन खणखणतायत
कश्मीरची बुकिंग रद्द करण्यासाठी आम्हाला दिवसभर फोन येतायत. हल्ला होण्याच्या आदल्या दिवशीदेखील बुकिंगसाठी फोन येत होते. मात्र दहशतवादी हल्ल्याच्या घटनेनंतर नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे. सरकारने पर्यटनाच्या ठिकाणी सुरक्षा वाढवावी, लोकांना विश्वास द्यावा अशी मागणी प्रथमेश देशपांडे यांनी केली आहे.

Comments are closed.