हमास आणि पाकिस्तानी दहशतवाद्यांमधील थेट संपर्क

इस्रायलचा दावा : हमासच्या काही सदस्यांचा पीओके दौरा

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

काश्मीरमध्ये सक्रीय दहशतवादी आणि हमास यांच्यात थेट संपर्क असल्याचा आरोप इस्रायलने केला आहे. हमासच्या काही नेत्यांनी अलिकडेच पाकव्याप्त काश्मीरचा दौरा केला होता. पीओकेत जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी आणि  काही अन्य लोकांची त्यांनी भेट घेतली होती आणि जैशच्या दहशतवाद्यांसोबत एका रॅलीला संबोधित केले होते. पहलगाम हल्ला आणि 7 ऑक्टोबर 2023 च्या हल्ल्यात समानता दिसून येत असल्याचा दावा इस्रायलचे भारतातील राजदूत रुवेन अजार यांनी केला आहे.

पहलगाम दहशतवादी हल्ला एक क्रूर आणि भयानक घटना आहे. याची तुलना 7 ऑक्टोबर 2023 रोजी हमासकडून इस्रायलवर करण्यात आलेल्या हल्ल्याची करता येऊ शकते. या हल्ल्याने भारताला हादरविले आहे आणि यात 7 ऑक्टेबर 2023 रोजी झालेल्या हल्ल्याचा प्रतिध्वनि असल्याचा दावा अमेरिकन ज्यू समितीचे मुख्य धोरण अधिकारी जेसन इसाकसन यांनी केला आहे.

भारताला पूर्ण समर्थन

हमासकडून 7 ऑक्टोबर 2023 रोजी करण्यात आलेला नरसंहार क्रूर होता आणि या हल्ल्याने मोठी खोल जखम केली आहे. जम्मू-काश्मीरमध्ये जे काही घडले, ते पाहून माझ्या मनासमोर 7 ऑक्टोबरच्या हल्ल्याचे चित्र उभे राहते. सुटी  घालविण्यासाठी आलेल्या लोकांवर हा एक क्रूर आणि भयानक हल्ला होता आणि पर्यटकांना हिंदू म्हणून लक्ष्य करण्यात आले होते. या दहशतवादी हल्ल्याने भारताला हादरविले असून जगभरातील लोकांना देखील भयभीत केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना दहशतवादाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी आमचे पूर्ण समर्थन असल्याचे इसाकसन यांनी म्हटले आहे.

Comments are closed.