पाकिस्तानी लष्करात राजीनामासत्र; 250 अधिकारी, 1200 सैनिकांचा लष्कराला शेवटचा सलाम

पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पलटवार करण्याचा इशारा देताच पाकिस्तानी लष्कराला कंपवात झाला आहे. पाकिस्तानी लष्करातील 250 अधिकारी आणि 1200 सैनिकांनी तडकाफडकी राजीनामा दिला आहे. युद्धाची रणदुदुंभी वाजत असतानाच सैनिकांचे मनोधैर्य खच्ची झाल्याने पाकिस्तानी लष्करात एकच खळबळ उडाली आहे.
पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात कोणत्याही क्षणी युद्धाला तोंड फुटेल अशी परिस्थिती आहे. पाकिस्तानातील राज्यकर्ते, लष्करी अधिकारी, मुत्सद्दी युद्धखोरीची भाषा करत आहेत. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहलगामच्या अपराध्यांना शोधून त्यांनी कल्पनाही केली नसेल अशी शिक्षा देण्याचे ठणकावून सांगताच पाकिस्तानी लष्कराला कापरे भरले.
पाकिस्तानी लष्करातून अचानक 250 अधिकारी आणि 1200 सैनिकांनी राजीनामे दिल्याचे पत्रच 11व्या कोअरचे कमांडर लेफ्टनंट उमर अहमद बुखारी यांनी लष्करप्रमुख असीम मुनीर यांना लिहिले आहे. हे गोपनीय पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.
बड्या लष्करी अधिकाऱ्यांचा कुटुंबकबिला परदेशात
भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्धाचे वारे वाहू लागताच पाकिस्तानातील उच्चपदस्थ लष्करी अधिकाऱ्यांनी आपापले कुटुंबकबिले परदेशी रवाना केले. खुद्द लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी आपले कुटुंब इंग्लंडला पाठवल्याचे वृत्त आहे. अनेक राजकीय नेत्यांनीही आपल्या आप्तस्वकीयांना परदेशी पाठवले आहे.
Comments are closed.