IPL 2025 हैदराबाद, कोलकाताही प्ले ऑफच्या शर्यतीत गॅसवर; चेन्नई, राजस्थान संघांचा साखळीतच गेम

गेल्या आयपीएलमध्ये दोनदा विजयाचा चौकार आणि त्यानंतर पराभवाचाही चौकार ठोकत प्ले ऑफ गाठणाऱया राजस्थानला यंदा सलग पाच पराभवांची नामुष्की सहन करावी लागली आणि तसेच आयपीएलचा सर्वात अनुभवी संघ असलेल्या चेन्नईला आयपीएलमध्ये सूरच न गवसल्यामुळे या संघांचा साखळीतच गेम झाला आहे. तब्बल सहा संघांनी दहापेक्षा अधिक गुण मिळवल्यामुळे गतविजेता कोलकाता आणि उपविजेता हैदराबाद हे दोन्ही संघ व्हेंटिलेटरवर असून त्यांना नॉनस्टॉप विजयांचा प्राणवायूच प्ले ऑफचे जीवदान देऊ शकते. प्ले ऑफच्या शर्यतीचा थरार टिपेला पोहोचला असून, काही संघ प्ले ऑफच्या सीमेवर पोहोचलेत, तर काहींसाठी एक एक सामना ‘जिंका किंवा मरा’ असा झालाय. त्यामुळे आयपीएलच्या आगामी लढतीत जो हार गया समजो बाहर गया अशी स्थिती झालीय.

गेल्या आयपीएलचा जेतेपदाचा सामना खेळणारे कोलकाता आणि हैदराबाद या संघांनी आतापर्यंत 9-9 सामने खेळले असून, तीन-तीन विजय मिळविले आहेत. कोलकात्याची एक लढत पावसामुळे रद्द झाल्याने त्यांच्या खात्यात 7, तर हैदराबादकडे 6 गुण आहेत. गुणतालिकेत कोलकाता सातव्या, तर हैदराबाद आठव्या स्थानी आहे. या संघांचे अद्यापि 5-5 सामने शिल्लक आहेत. मात्र, यातील एक सामना जरी गमावला तरी दोन्ही संघांना बॅगा भराव्या लागणार आहेत.

दिल्ली, मुंबई प्ले ऑफच्या दारावर

दिल्ली पॅपिटल्स व मुंबई इंडियन्स या संघांनी प्रत्येकी 12 गुणांसह आयपीएलच्या गुणतक्त्यात अनुक्रमे चौथे व तिसरे स्थान काबीज केलेले आहे. दिल्लीने आतापर्यंत खेळलेले 9 पैकी 6 सामने जिंकलेले आहेत. या संघाला प्ले ऑफ गाठण्यासाठी किमान दोन विजयांची गरज आहे. त्यांचे पाच सामने अजूनही शिल्लक असल्याने त्यांना प्ले ऑफ गाठण्याची संधी असेल. मुंबईने लागोपाठ पाच सामने जिंकून प्ले ऑफच्या शर्यतीत जोरदार मुसंडी मारली आहे. त्यांनी 10 पैकी 6 सामने जिंकले आहेत. आता उर्वरित चार सामन्यांत दोन विजय मिळविले तरी मुंबईचा संघ प्ले ऑफ गाठेल. त्यामुळे या घडीला तरी दिल्ली व मुंबई हे दोन संघ प्ले ऑफच्या शर्यतीत सेफ झोनमध्ये वाटतात.

लखनौ, पंजाबला जोर लावावा लागेल

लखनौ सुपर जायंट्सने आतापर्यंत खेळलेल्या 10 सामन्यांत 5 विजय मिळविलेले आहेत. अखेर लागोपाठ दोन पराभवांमुळे हा संघ गुणतक्त्यात सहाव्या स्थानावर आहे. लखनौचे अजून चार सामने शिल्लक असून, यातील तीन सामने जिंकले तरच हा संघ प्ले ऑफमध्ये दाखल होणार आहे. दुसरीकडे पंजाब किंग्ज संघ 11 गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. कोलकात्याविरुद्धची लढत पावसामुळे रद्द झाल्याने पंजाबचीही गुणसंख्या विषम झाली आहे. या संघाला आणखी पाच सामने खेळायचे असून, यात किमान तीन विजय अनिवार्य आहेत. त्यामुळे लखनौ व पंजाब या दोन्ही संघांना प्ले ऑफ गाठण्यासाठी जोर लावावा लागणार आहे.

बंगळुरू, गुजरातचे स्थान पक्के

बंगळुरू व गुजरात हे दोन संघ अनुक्रमे पहिल्या व दुसऱया स्थानावर विराजमान आहेत. त्यामुळे या दोन्ही संघांचे प्ले ऑफचे स्थान जवळजवळ पक्के झाले आहे. बंगळुरूने आतापर्यंत 10 पैकी 7 लढती जिंकल्या असून, त्यांच्या खात्यात सर्वाधिक 14 गुण जमा आहेत. त्यांना आणखी चार सामने खेळायचे असून, प्ले ऑफ गाठण्यासाठी केवळ एक विजय पुरेसा आहे. गुजरात टायटन्सने 8 पैकी 6 लढती जिंकल्या आहेत. त्यांना आणखी सहा सामने खेळायचे आहेत, तर विजय केवळ दोनच हवे आहेत. त्यामुळे या संघालाही प्ले ऑफ गाठण्यासाठी कोणताही अडथळा नसेल.

Comments are closed.