16 पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी घातली

बीबीसीला भारत सरकारने पाठविली नोटीस

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रक्षोभक आणि सांप्रदायिक स्वरुपात संवेदनशील सामग्री फैलावण्याच्या आरोपाखाली भारत सरकारने 16 पाकिस्तानी युट्यूब चॅनल्सला ब्लॉक केले आहे. या युट्यूब चॅनल्सचे एकूण 3.6 कोटी सब्सक्रायबर्स होते असे सांगण्यात आले. तर संबंधित कारवाई केंद्रीय गृह मंत्रालयाच्या शिफारसीच्या आधारावर करण्यात आली आहे.

ब्लॉक करण्यात आलेल्या चॅनल्समध्ये पाकिस्तानी वृत्तवाहिनी डॉन, समा टीव्ही, एआरवाय न्यूज, बोल न्यूज, रफ्तार, जियो न्यूज आणि सुनो न्यूज सामील आहे. तसेच पत्रकार इर्शाद भट्टी, असमा शिराजी, उमर चीमा आणि मुनीब फारुक यांच्या युट्यूब चॅनलवरही बंदी घालण्यात आली आहे. याचबरोबर द पाकिस्तान रेफरन्स, समा स्पोर्ट्स, उझेर क्रिकेट आणि राझी नामा यासारखे अन्य प्लॅटफॉर्म देखील या यादीत आहेत. संबंधित युट्यूब चॅनेल भारत, भारतीय सैन्य आणि सुरक्षा यंत्रणांविषयी खोटा, भ्रामक आणि चिथावणीपूर्ण दुष्प्रचार करत होते. पहलगाम येथील हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांचे संबंध तणावपूर्ण झाले असताना या दुष्प्रचाराने जोर पकडला होता.

संबंधित युट्यूब चॅनल्सना अॅक्सेस करण्याचा प्रयत्न करणाऱ्या युजर्सना आता ‘ ही सामग्री राष्ट्रीय सुरक्षा किंवा सार्वजनिक व्यवस्थेशी निगडित सरकारी आदेशामुळे या देशात उपलब्ध नाही, अधिक माहितीसाठी गुगल ट्रान्सपरन्सी रिपोर्ट पहा’ असा संदेश दिसून येणार आहे.

बीबीसीच्या वृत्तांकनावर तीव्र आक्षेप

भारत सरकारने बीबीसीच्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर करण्यात आलेल्या वृत्तांकनावर सोमवारी तीव्र आक्षेप नोंदविला आहे. बीबीसीने स्वत:च्या ‘पाकिस्तान सस्पेंड्स व्हिसाज फॉर इंडियन्स आफ्टर डेडली काश्मीर अटॅक’ नावाच्या रिपोर्टमध्ये या दहशतवादी हल्ल्याला ‘मिलिटेंट अटॅक’ (उग्रवादी हल्ला) संबोधिले होते. या शब्दावलीने नाराज होत भारत सरकारने बीबीसी इंडियाचे प्रमुख जॅकी मार्टिन यांना औपचारिक पत्र लिहिले आहे. बीबीसीची शब्दनिवड घटनेचे गांभीर्य आणि दहशतवादाच्या वास्तव्याला कमी लेखणारी असल्याचे पत्रात भारत सरकारने म्हटले आहे. विदेश मंत्रालय पुढील काळात बीबीसीच्या वृत्तांकनावर बारकाईने नजर ठेवणार आहे. अशाप्रकारचे वृत्तांकन केवळ भ्रामक नसून दहशतवादासारख्या गंभीर मुद्द्याला कमी लेखण्याचा हा प्रकार आहे, जो अस्वीकारार्ह असल्याचे सरकारने बीबीसीला कळविले आहे.

Comments are closed.