'… आता अंतिम खाती तोडगा!'
पहलगाम हल्ल्यावरून फारुख अब्दुल्लांचा सल्ला : पाकिस्तानला सूचक संदेश
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे देशभरात शोक आणि संतापाचे वातावरण आहे. याचदरम्यान माजी मुख्यमंत्री आणि जम्मू काश्मीर नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला यांनी या हल्ल्यासाठी पाकिस्तानचा निषेध केला. तसेच आता पाकिस्तानवर अंतिम कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला. आज भारताला बालाकोटसारखी कारवाई नको आहे, आज भारताला असे वाटते की पाकिस्तानवर अशी कारवाई करावी जेणेकरून अशा घटना पुन्हा घडू नयेत, असे ते म्हणाले.
आता पाकिस्तानशी चर्चेचा प्रश्नच उद्भवत नाही. कारण त्यांनी मानवतेचा खून केला आहे. भारताने 1947 मध्येच द्वि-राष्ट्र सिद्धांत नाकारला होता आणि आजही तो स्वीकारण्यास तयार नाही, कारण देशात हिंदू, मुस्लीम, शीख, ख्रिश्चन सर्व एक आहेत, असे अब्दुल्ला म्हणाले. आमच्या शेजारी देशाला अजूनही आपण मानवतेची हत्या करत असल्याची जाण येत नाही. केवळ चर्चेतून काहीही साध्य होणार नाही. भारताविषयीचे गैरसमज पाकिस्तानने दूर करणे आवश्यक आहे. पाकिस्तान म्हणत आहे की चर्चा व्हायला हवी. चर्चा म्हणजे नेमके काय व्हायला हवे? मी नेहमीच संवादांना प्राधान्य द्यायचो. मला नेहमीच संवाद साधायचा होता. पण पाकिस्तानचे मनसुबे वेगळे आहेत, असे स्पष्ट करत अब्दुल्ला यांनी पाकिस्तानला कठोर शब्दात सूचक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.
Comments are closed.