भारतीय राजदूतांनी तालिबानशी चर्चा केली

पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर महत्वपूर्ण भेट

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

भारताचे राजकीय दूत एम. आनंद प्रकाश यांनी अफगाणिस्तानच्या तालिबान सरकारमधील कार्यकारी विदेश व्यवहार मंत्री अमीर खान मुत्तकी यांची भेट घेतली आहे. पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाल्याने ती महत्वपूर्ण मानण्यात येत आहे. प्रकाश हे भारताच्या परराष्ट्र विभागात पाकिस्तान-अफगाणिस्तान-इराण विभागाचे सहसचिव आहेत. नुकतीच त्यांची या पदावर नियुक्ती झाली आहे.

रविवारी ही भेट झाल्याची माहिती अफगाणिस्तानच्या विदेश व्यवहार विभागाकडून देण्यात आली आहे. प्रकाश आणि मुत्तकी यांनी परस्पर संबंध, शांतता, गुंतवणूक आणि आर्थिक सहकार्य आदी विषयांवर चर्चा केली. दक्षिण आशिया विभागात नुकत्याच घडलेल्या काही घडोमोडींसंबंधीही चर्चा करण्यात आली. तथापि, या घडामोडींसंबंधी सविस्तर माहिती देण्यात आली नाही.

गुंतवणूक वाढविणार

भारत अफगाणिस्तानच्या पायाभूत क्षेत्रात गुंतवणूक वाढवू इच्छित आहे. अफगाणिस्तानलाही आपल्या देशातील पायाभूत सुविधांचा विकास करावयाचा आहे. त्यामुळे प्रकाश यांनी या गुंतवणुकीचा प्रस्ताव अफगाणिस्तानसमोर ठेवला आहे. भारत आणि अफगाणिस्तान हे परस्पर संबंधांमध्ये अधिक दृढता आणू इच्छित आहेत, हे या चर्चेवरुन दिसून येते, असे मत काही तज्ञांनी व्यक्त केले.

पहलगाम, पाकिस्तानवर चर्चा ?

प्रकाश आणि मुत्तकी यांच्यातील चर्चेत पहलगाम हल्ला आणि पाकिस्तान या विषयांवर चर्चा झाली आहे काय, यासंबंधात अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. तथापि, ही चर्चा झाली आहे, अशी सूत्रांची माहिती आहे. पहलगाम हल्ल्याच्या नंतर अफगाणिस्ताननेही या हल्ल्याचा कठोर शब्दांमध्ये निषेध केला होता. भारताला समर्थन दिले होते, तर पाकिस्तानचा निषेध केला होता.

भारताकडून दुजोरा नाही

अफगाणिस्तानचे कार्यकारी विदेश व्यवहार मंत्री मुत्तकी यांच्याशी भारताच्या दूताने चर्चा केल्याच्या वृत्ताला भारताने अद्याप दुजोरा दिलेला नाही. तथापि, या वृत्ताचा स्पष्टपणे इन्कारही केलेला नाही त्यामुळे गूढ निर्माण झाले आहे. तसेच ही भेट झालीच असेल, तर तिचा उद्देश नेमका कोणता होता, तसेच चर्चा नेमक्या कोणत्या विषयांवर झाली, यांच्या संदर्भात बरीच उलट सुलट चर्चा होत आहे.

अफगाणिस्तानची भूमिका महत्वाची

पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला लक्षात राहील असा धडा देण्याचा निर्धार केला आहे. पहिले पाऊल म्हणून भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सिंधू जलवितरण कराराला स्थगिती भारताने दिली आहे. त्यामुळे भारतातून पाकिस्तानकडे जाणाऱ्या सर्व सहा नद्यांमधील पाणी अडविण्याचे धोरण भारत स्वीकारु शकतो. अफगाणिस्तानमधूनही काही नद्या सिंधू नदीला येऊन मिळतात. या नद्यांचे पाणी पाकिस्तानकडे जाऊ दिले जाणार नाही, अशी भूमिका अफगाणिस्ताननेही घोषित केली आहे. त्यामुळे, पाकिस्तानविरोधात भारत आणि अफगाणिस्तान हे दोन्ही देश एकत्रितरित्या काही कृती करणार आहेत काय, आणि याचसंबंधात ही भेट होती काय, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

सिंधू जलकरार स्थगित केल्यानंतर…

भारत आणि पाकिस्तान यांच्यात 1960 मध्ये झालेला सिंधू जलवितरण करार पहलगाम हल्ल्यानंतर भारताने स्थगित ठेवला आहे. या करारात तो रद्द करण्याची तरतूद प्रारंभापासूनच करण्यात आलेली नाही. तथापि, दोन्ही देशांपैकी कोणीही हा करार तात्पुरता स्थगित करु शकतो. भारताने सध्या ती कृती केली आहे. तसेच सिंधू, झेलम, चिनाब, सतलज आणि रावी या पाच नद्यांचे पाणी पाकिस्तानला मिळू नये, यासाठी तीनस्तरीय कार्यक्रमाची रचनाही केली आहे, असे स्पष्ट केले गेले.

Comments are closed.