वैभव सूर्यवंशीची निर्भीड खेळी, सामनावीर बनताच रचला नवा इतिहास!

आयपीएल 2025 च्या 47व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सच्या 14 वर्षीय वैभव सूर्यवंशीने गुजरात टायटन्सविरुद्ध केवळ 35 चेंडूत 7 चौकार आणि 11 षटकारांसह शतक ठोकले. तो आयपीएलमध्ये सर्वात तरुण (14 वर्षे 32 दिवस) शतकवीर बनला आणि युसूफ पठाणचा विक्रम मोडत सर्वात जलद भारतीय शतकवीर ठरला. आयपीएल इतिहासात ख्रिस गेलचे 30 चेंडूत शतक सर्वात वेगवान आहे.

वैभव सूर्यवंशीच्या या विक्रमी शतकामुळे राजस्थान रॉयल्स संघ 15.5 षटकांत 210 धावांचे लक्ष्य गाठला. त्याच्या शानदार शतकासाठी सूर्यवंशीची सामनावीर म्हणून निवड झाली. अशाप्रकारे, तो आयपीएलमध्ये सामनावीराचा पुरस्कार जिंकणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला. त्याच्या तिसऱ्या आयपीएल सामन्यात त्याला सामनावीर म्हणून निवडण्यात आले.

राजस्थान रॉयल्सने गुजरात टायटन्सवर केलेल्या शानदार विजयानंतर, वैभव सूर्यवंशी म्हणाला की शतक ठोकल्यानंतर खूप चांगले वाटते. तिसऱ्या डावात आयपीएलमधील हे त्याचे पहिले शतक आहे. स्पर्धेपूर्वी गेल्या तीन-चार महिन्यांपासून तो करत असलेल्या मेहनतीचे आता फळ दिसत आहे.

वैभव सूर्यवंशी म्हणाला, “मी मैदानावर फारसा विचार करत नाही, माझं संपूर्ण लक्ष फक्त चेंडूवर असतं.” यशस्वीसोबत भागीदारीबद्दल बोलताना तो म्हणाला, “यशस्वीसोबत फलंदाजी करणे खूप सोपं वाटतं, कारण तो नेहमीच सकारात्मक असतो आणि सतत उपयोगी सल्ला देत राहतो, ज्यामुळे आत्मविश्वास वाढतो.”

आयपीएलमध्ये शतक झळकावल्याबद्दल वैभवने भावना व्यक्त करताना म्हणाला, “हे खरंच स्वप्न पूर्ण झाल्यासारखं आहे.”
गोलंदाज त्याच्यावर आता विशेष लक्ष ठेवतील का, असा प्रश्न विचारल्यावर हा 14 वर्षीय खेळाडू ठामपणे म्हणाला, “मला त्याची भीती वाटत नाही. मी या गोष्टींवर लक्ष देत नाही. माझं पूर्ण लक्ष फक्त माझ्या खेळावर आहे.”

Comments are closed.