Uddhav Thackeray reminds BJP of Balasaheb
(India Vs Pakistan) मुंबई : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ‘‘भारत-पाक क्रिकेट होणार नाही, होऊ देणार नाही’’ असा इशारा देताच पाकड्यांची तणतणली होती. ‘तुम्ही काश्मिरात आमच्या हिंदूंचे मुडदे पाडायचे आणि भारताने मुडदे पाडणाऱ्यांशी क्रिकेट खेळायचे हे ढोंग चालणार नाही,’ ही शिवसेनाप्रमुखांची तेव्हा भूमिका होती. मात्र बाळासाहेबांचे मन वळवायला तेव्हा ‘भाजपा’ परिवार मुंबईत धावला. ‘‘साहेब, राजकारणात धर्म आणि खेळ आणू नका. राजनैतिक संबंध ठेवावे लागतात. जरा सबुरीने घ्या,’’ अशी वकालत तेव्हा करणारे आज पाकड्यांच्या दिल्लीतील वकिलाती बंद करीत आहेत आणि त्यांच्याशी क्रिकेट खेळू नये असे बोलत आहेत, असा जोरदार हल्लाबोल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे. (Uddhav Thackeray reminds BJP of Balasaheb)
पाकिस्तानशी क्रिकेट खेळणार नाही, असा धुरळा उडवला जात आहे, पण दोनेक महिन्यांपूर्वी एक वर्ल्ड कप दुबईत झाला तेव्हा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे पुत्र तसेच आयसीसीचे अध्यक्ष जय शहा, महाराष्ट्रातून मिधेंची पोरे, इतर मंत्र्यांची पोरे, भाजपा मराठी हे दुबईतील शेखांच्या बगलेत बसून, पाकड्या खेळाडूंना बाजूला बसवून पाकिस्तान-भारत क्रिकेट सामन्यात राष्ट्रवादाला ‘चार चांद’ लावत होते, हे काय देशाने पाहिले नाही? असेही माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुनावले आहे.
हेही वाचा – Thackeray on BJP : …त्याशिवाय राष्ट्रभक्तीला कधीच फेस येत नाही, उद्धव ठाकरेंचा भाजपावर निशाणा
जय शहा हे सध्या दुबईतच असतात. त्यांच्याप्रमाणे अनेक ‘राष्ट्रभक्त’ भाजपावाल्यांची पोरे धंदापाणी करण्यासाठी आणि भारतातील लुटीचा पैसा जिरवण्यासाठी दुबई, सिंगापूर, मॉरिशस येथे आहेत आणि तेथून ते काश्मिरातील हल्ल्याचा निषेध करीत आहेत. पाकिस्तानला धडा शिकवा, असे सांगत आहेत. त्या राष्ट्रभक्तांचे इतकेच राष्ट्रप्रेम उफाळून जात होते तर, मग स्वदेश सोडून परदेशी का गेले? वीर सावरकरांचे हृदय ज्याप्रमाणे मातृभूमीच्या ओढीने तळमळत होते, तसे त्यांचे हृदय फक्त भारतावर हल्ला झाला तरच तळमळते किंवा डचमळते का? असे तिखट प्रश्नही त्यांनी सामना दैनिकातील अग्रलेखातून केले आहेत.
देशासाठी मर मिटायचे भारतातील पोरांनी आणि भाजपावाल्यांच्या पोरांनी परदेशात सुखी आणि सुरक्षित जीवन जगायचे? आमची तर भारत सरकारकडे राष्ट्रीय प्रेमाची मागणी आहे. राष्ट्रभक्तीचा फेस असा फसफसू लागलाच आहे तर एक करा, भाजपा आणि संघ परिवारात ज्या शूर वीरांचे बाहू आणि मनगटे आज फुरफुरत आहेत आणि ‘युद्ध करा’ असा घोषा जे लावीत आहेत, त्यापैकी किती जणांनी विदेशी बायका केल्या तसेच किती जणांची पोरे नोकरीधंद्यासाठी परदेशी भूमीत कायमची स्थिरावली आहेत, किती जणांनी परदेशात इस्टेटी केल्या त्यांची यादी जाहीर करा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
याशिवाय, ज्यांची पोरे विदेशात आणि बायको विदेशी आहे अशांना भारतात सत्तेचे पद मिळणार नसल्याचा कायदाच करा. विदेशातल्या या सर्व पोरांना बोलवून सक्तीचे सैन्य प्रशिक्षण देऊन सीमेवर पाठवा. मग त्यांना कळेल, देशभक्ती म्हणजे केवळ शब्दांचे बुडबुडे नाहीत, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी समाचार घेतला आहे.
हेही वाचा – Pahalgam Terror Attack : संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा, काँग्रेसचे पंतप्रधान मोदींना पत्र
Comments are closed.