4 दिवसात सेहवागला ठरवलं चुकीचं! वैभव सूर्यवंशीने बॅटने दाखवली खरी ताकद
यंदाच्या आयपीएल हंगामात (24 एप्रिल) रोजी राजस्थान रॉयल्स आणि राॅयल चॅलेंजर्स बंगळुरू (RR vs RCB) संघ आमनेसामने होते. यावेळी राजस्थान रॉयल्ससमोर विजयासाठी 206 धावांचे लक्ष्य होते, राजस्थान रॉयल्सकडून धमाकेदार सुरुवात अपेक्षित होती, परंतु 14 वर्षीय फलंदाज वैभव सूर्यवंशी (Vaibhav Suryavanshi) या सामन्यात फक्त 12 चेंडूत 16 धावा काढून पॅव्हेलियनमध्ये परतला. या खेळीनंतर वीरेंद्र सेहवागने वैभव सूर्यवंशीबद्दल मोठी गोष्ट सांगितली होती, त्याने त्याच्या खेळण्याच्या दृष्टिकोनावर प्रश्न उपस्थित केले होते. परंतु अवघ्या 4 दिवसांनी वैभवने सेहवागला चुकीचे सिद्ध करत त्याचे उत्तर बॅटने दिले.
(28 एप्रिल) रोजी जयपूरच्या मैदानावर खेळल्या गेलेल्य गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात वैभव सूर्यवंशीने 35 चेंडूत शतक झळकावले. त्याने 38 चेंडूत 101 धावांची दमदार खेळी केली. वैभवने आपल्या खेळीत 7 चौकारांसह 11 षटकार मारले. वैभवच्या दमदार शतकांनी आयपीएलच्या इतिहासातील अनेक विक्रम तुटले गेले. वैभवने या शतकानंतर अनेक नव्या विक्रमांना गवसणी घातली.
काय म्हणाला होता वीरेंद्र सेहवाग?
आरसीबीविरुद्धच्या खेळीनंतर सेहवाग म्हणाला होता की जर तो या आयपीएलमध्ये खूश असेल आणि त्याला वाटत असेल की तो आता करोडपती झाला आहे, त्याचे पदार्पण उत्तम झाले होते, त्याने पहिल्याच चेंडूवर षटकार मारला होता, तर कदाचित तो पुढच्या वर्षी खेळताना दिसणार नाही. सेहवाग पुढे म्हणाला की त्याने असे अनेक खेळाडू येताना पाहिले आहेत जे 1-2 सामन्यांनंतर प्रसिद्ध होतात. पण नंतर ते काहीच करत नाहीत.
वीरेंद्र सेहवागने (Virender Sehwag) कोहलीचे उदाहरण देत म्हटले होते की, विराट कोहलीकडे (Virat Kohli) पहा, त्याने वयाच्या 19व्या वर्षी सुरुवात केली आणि आता सर्व 18 आयपीएल हंगाम खेळले आहेत, वैभवचे ध्येय एकच असले पाहिजे.
राजस्थान रॉयल्सकडून खेळताना, सूर्यवंशीने सोमवारी (28 एप्रिल) रात्री जयपूरमध्ये खेळलेल्या आयपीएल सामन्यात गुजरात टायटन्सच्या राशीद खानला मिडविकेटवर षटकार मारून टी20 मध्ये सर्वात कमी वयात शतक ठोकण्याचा पराक्रम केला. सूर्यवंशीने 35 चेंडूत शतक ठोकले. दरम्यान त्याने राजस्थान रॉयल्सचा माजी फलंदाज युसूफ पठाणचा भारतीय खेळाडूकडून सर्वात जलद टी20 शतक करण्याचा विक्रम मोडला. 15 वर्षांपूर्वी पठाणने 37 चेंडूत शतक ठोकले तेव्हा सूर्यवंशी जन्मालाही आला नव्हता.
Comments are closed.