सशस्त्र दलांना योग्य कारवाई करण्याची पूर्ण परवानगी
पंतप्रधान नरेंद्र मोदी, सेनाप्रमुख बैठकीत निर्णय
► वृत्तसंस्था / नवी दिल्ली
पहलगाम येथे जो भीषण आणि क्रूर दहशतवादी हल्ला झाला आहे, त्याचे आक्रमक प्रत्युत्तर दिले जाईल, असा स्पष्ट संकेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे. त्यांनी मंगळवारी भारताच्या तिन्ही दलांचे संयुक्त सेनाप्रमुख आणि तिन्ही सेनादलांच्या प्रमुखांसमवेत महत्त्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीत सेनादलांना योग्य ती कृती करण्याचा पूर्ण अधिकार आणि मुभा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
ही बैठक चार तासांहून अधिक काळ चालली होती. बैठकीत तिन्ही सेनादलांचे प्रमुख जनरल अनिल चौधरी, भूसेना प्रमुख उपेंद्र द्विवेदी, वायुदल प्रमुख एअर चीफ मार्शल विवेक राम चौधरी, नौदल प्रमुख अॅडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी, संरक्षणमंत्री राजनाथसिंग आणि संरक्षण विभागातील इतर महत्त्वाचे अधिकारी उपस्थित होते. सेनाधिकाऱ्यांनी सध्याच्या परिस्थितीची पूर्ण कल्पना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिली. तसेच सेना दलांची सज्जता किती आहे, याचीही माहिती दिली. त्यानंतर सेनादलांना योग्य त्या स्थानी, योग्य त्या समयी आणि योग्य ती कृती करण्याचा पूर्ण अधिकार आणि मुभा देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.
सेनेच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास
केंद्र सरकारचा आणि भारताच्या जनतेचा आपल्या सेनादलांच्या आणि सैनिकांच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास आहे. त्यांच्या पराक्रमावर आणि युद्धनीतीवरही आमचा अध्याधिक भरवसा आहे. त्यामुळे प्राप्त परिस्थितीत सेना दलांनी योग्य त्या कारवाईचा निर्णय घ्यावा. निर्णय सरकारचा असला तरी त्याची अंमलबजावणी सेनादलांना करावी लागणार आहे. त्यामुळे त्यांनी त्यांच्या पद्धतीने योग्य तो निर्णय घ्यावा. मात्र, कोणत्याही परिस्थितीत या दहशतवादी हल्ल्यात बळी पडलेल्यांचे बलिदान आम्ही व्यर्थ जाऊ देणार नाही, हा केंद्र सरकारचा आणि सेनादलांचा निर्धार आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बैठकीनंतर केले आहे.
बैठकीत नेमके काय ठरले ?
या अत्यंत महत्त्वपूर्ण बैठकीत नेमके काय ठरले, याची माहिती देण्यात आली नाही. अर्थात, तशी माहिती देण्यातही येत नाही. विशेषत: तिन्ही सेनादलांच्या प्रमुखांशी झालेल्या कोणत्याही बैठकीचा वृत्तांत गुप्त ठेवला जातो. तथापि, मोघम आणि सर्वसाधारण माहिती जनतेच्या सोयीसाठी दिली जाते. त्यामुळे केवळ सेना दलांना मुभा देण्यात आली आहे, असे स्पष्ट करण्यात आले आहे. तथापि, तज्ञांच्या माहितीनुसार काहीतरी मोठा निर्णय या बैठकीत झाला आहे.
अमित शहा यांच्याशीही बैठक
संयुक्त सेना प्रमुख आणि तिन्ही सेनादलांच्या प्रमुखांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बैठक झाल्यानंतर त्वरित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासमवेत महत्त्वपूर्ण चर्चा केली. ही चर्चाही साधारणत: एक तास चालली होती. सीमेवर सीमा सुरक्षा दलाची भूमिका महत्त्वाची असते. सीमा सुरक्षा दल आणि इतर अर्धसैनिक दलांवर केंद्रीय गृहमंत्रालयाचे नियंत्रण असते. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमित शहा यांच्याशीही चर्चा केली असावी, असे अनुमान आहे. या बैठकीत काय निर्धारित करण्यात आले, या संबंधी कोणतेही वृत्त देण्यात आलेले नाही. मात्र, चर्चा देशातील परिस्थिती, सीमेवरील स्थिती आणि केंद्र सरकार जो निर्णय घेणार आहे, त्यासंबंधी चर्चा झाल्याची शक्यता आहे.
मोहन भागवत यांचीही भेट
सरसंघचालक मोहन भागवत यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अधिकृत निवासस्थानी त्यांची भेट घेतली आहे. मंगळवारी झालेल्या बैठकांच्या धामधुमीत या दोन नेत्यांचीही भेट झाल्याने व्यापक संकेत मिळत आहेत. हा दबावतंत्राचा भाग आहे, की खरोखरच मोठा निर्णय झाला आहे, हे लवकरच स्पष्ट होणार आहे.
आज होणार महत्त्वाचा निर्णय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सेनादलांचे प्रमुख आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी मंगळवारी बैठकी झाल्यानंतर आज बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षा समितीची अत्यंत महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीत जो निर्णय होईल तो अंतिम मानला जाणार आहे. त्यामुळे आता या बैठकीकडे साऱ्यांची दृष्टी लागलेली आहे. ही बैठक बुधवारी सकाळी किंवा दुपारी होण्याची शक्यता आहे. या बैठकीत पुढील कृतीची निश्चित योजना निर्धारीत केली जाण्याची शक्यता आहे. तसेच मंगळवारी ज्या बैठका झाल्या, त्यांच्यात निर्धारित करण्यात आलेल्या बाबींची माहिती सुरक्षा समितीला दिली जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
लोकांमध्ये मोठी उत्सुकता…
ड मंगळवारच्या बैठका आणि बुधवारची महत्त्वपूर्ण बैठक यांसंबंधी उत्सुकता
ड नेमका कोणता निर्णय झाला आहे किंवा होणार आहे, यासंबंधी औत्सुक्य
ड कोणती कृती करायची हे लवकरच निर्धारित केले जाण्याची शक्यता व्यक्त
ड बैठकांसंबंधी अतिशय गुप्तता, केवळ मोघम, सर्वसाधारण माहितीच बाहेर
Comments are closed.