पेहलगम हल्ल्याचा पूर्वतयारी झाला

धर्म विचारुनच हल्ला केल्याचे तपासात झाले स्पष्ट

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

पेहलगामचा दहशतवादी हल्ला पूर्वनियोजित होता, असे राष्ट्रीय अन्वेषण प्राधिकारणाने (एनआयए) केलेल्या आतापर्यंतच्या संशोधनात स्पष्ट झाले आहे. पेहलगामच्या बैसारन खोऱ्यानजीकच्या एका स्टॉलवर हे दहशतवादी हल्ला होण्यापूर्वी दोन दिवसांपासून वास्तव्यास होते, असे तपासात दिसून आले आहे.

दोन दहशतवादी खोऱ्यानजीकच्या फूड स्टॉलनजीक बसलेले होते. त्या फूट स्टॉलच्या जवळ हा दहशतवादी हल्ला झाला होता. या दहशतवाद्यांची छायचित्रे मिळाली असून त्यांच्यावरुनच येथील स्थानिकांनी त्यांना ओळखले आहे. फूड स्टॉलच्या मालकानेही त्यांना पाहिल्याचे एनआयएकडे मान्य केले आहे.

दोन दिवस आधीची होती योजना

हा हल्ला दोन दिवस आधीच होणार होता. तथापि, हवामान खराब असल्याने पर्यटकांची संख्या फारशी नव्हती. जे पर्यटक होते, ते त्यांच्या हॉटेलांमध्ये बसून राहिले होते. त्यामुळे दहशतवाद्यांनी हल्ल्याची योजना पुढे ढकलली होती. दोन दिवसांनी वातावरण स्वच्छ झाल्यानंतर अनेक पर्यटक फिरण्यासाठी म्हणून हॉटेलांच्या बाहेर पडले, त्यावेळी आधीपासूनच दबा धरुन बसलेल्या दहशतवाद्यांनी हल्ल्याची संधी साधली, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यातून समोर येत आहे.

धर्म विचारुनच हत्या

दहशतवाद्यांनी पर्यटकांची हत्या धर्म विचारुन केली काय, यावर अनेक पुरोगामी आणि धर्मनिरपेक्ष म्हणवून घेणारे विचारवंत आणि नेते शंका उपस्थित करत आहेत. दहशतवाद्यांकडे धर्म विचारण्याइतका वेळ असतो का, असा प्रश्नही विचारला जात आहे. तथापि, एनआयएने आतापर्यंत अनेक प्रत्यक्षदर्शींकडे चौकशी केली आहे. ज्यांचे पुरुष नातेवाईक मारण्यात आले, त्या पर्यटक महिलांनीही ‘धर्म विचारुनच’ मारण्यात आल्याचे एनआयएकडे स्पष्ट केले आहे. इतकेच नव्हे, तर काही पुरुष पर्यटकांची पँट उतरवून ते हिंदू आहेत अशी खात्री झाल्यानंतर त्यांना अत्यंत जवळून गोळी मारण्यात आली आणि त्यांना मारण्यात आले, अशीही अत्यंत क्रोध आणणारी माहिती या प्रत्यक्षदर्शींनी एनआयएला दिल्याचे स्पष्ट झाले आहे.

स्फोटक माहिती

एनआयएच्या प्राथमिक तपासात या हल्ल्यासंबंधी अत्यंत स्फोटक माहिती उपलब्ध झाली आहे. हा हल्ला केवळ माणसे मारण्यासाठी नव्हता, तर हिंदू पुरुषांची हत्या करण्यासाठी होता. हिंदू समाजात भीती पसरावी, हा हेतू त्यामागे होता. काश्मीरमध्ये निर्माण होत असलेली शांतता भंग करावी आणि तेथील मुस्लीम स्थानिकांना दहशतवाद्यांवरच अवलंबून रहावे लागावे, ही या हल्ल्याची योजना होती, असे अनेक बाबी एनआयएच्या प्राथमिक तपासातून स्पष्ट होत आहेत.

5 हजार लोकांची उपस्थिती

हल्ला झाला त्या दिवशी घटनास्थळाच्या आसपास 5 हजार स्थानिक आणि पर्यटकांची उपस्थिती होती. अशी गर्दी पाहूनच त्याच वेळी हल्ला करण्याचा निर्णय दहशतवाद्यांनी घेतला असावा, असा एनआयएचा तर्क आहे. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार आधी चार पर्यटकांना धर्म विचारुन मारण्यात आले. त्यामुळे दहशतीचे वातावरण निर्माण झाले. अनेक पर्यटकांनी पळण्याचा प्रयत्न केला. तसेच काही पर्यटक ख•dयांमध्ये लपले. सर्वत्र घबराट पसरली, असे उघड होत आहे.

महत्वाची माहिती गुप्तच ठेवणार

एनआयएने प्राथमिक तपासात मिळालेली केवळ काही माहितीच उघड केली आहे. मुख्य आणि संवेदनशील माहिती गुप्त ठेवण्यात आली असून तो एनआयएच्या कार्यपद्धतीचा भाग असल्याचे स्पष्ट करण्यात आले. ज्यावेळी हे प्रकरण न्यायालयात जाईल, तेव्हा सर्व माहिती उघड होण्याची शक्यता आहे.

Comments are closed.